टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड संघात लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. यामध्ये इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने (Ben Duccket Century) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शानदार शतकी खेळी केली.
डावाची सुरुवात करताना डकेटने 135 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 141 धावा केल्या. या शतकासह, लॉर्ड्सवर कसोटी आणि वनडे अशा दोन्ही प्रकारात शतक झळकावणारा तो जगातील केवळ सहावा सलामीवीर ठरला आहे. याचबरोबर, लॉर्ड्सच्या मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रमही डकेटने आपल्या नावे केला.
याआधी वनडे फॉरमॅटमध्ये लॉर्ड्सवर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम वेस्ट इंडिजचे दिग्गज विव्ह रिचर्ड्स यांच्या नावावर होता, जो त्यांनी 1979 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता. डकेटने 47 वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडीत काढला आहे.
लॉर्ड्सवर सर्वोच्च धावसंख्या (वनडे क्रिकेट)
141 धावा: बेन डकेट वि. भारत, 2026
138 धावा:* विव्ह रिचर्ड्स विरुद्ध इंग्लंड, 1979 (वर्ल्ड कप फायनल)
137 धावा: डेनिस एमिस विरुद्ध भारत, 1975
137 धावा: मार्कस ट्रेस्कोथिक विरुद्ध पाकिस्तान, 2001
136 धावा: ग्रॅहम गूच विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1989
लॉर्ड्सवर कसोटी आणि वनडे, दोन्हीमध्ये शतक ठोकणारे सलामीवीर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, डेनिस एमिस, ग्रॅहम गूच, ग्रेम वूड, मार्कस ट्रेस्कोथिक, ॲलिस्टर कुक आणि बेन डकेट हे खेळाडू आहेत.
लॉर्ड्सवर खेळला जाणारा हा तिसरा वनडे सामना निर्णायक ठरणार आहे. कारण, जो संघ हा सामना जिंकेल तो मालिका आपल्या नावे करेल. 14 जुलै रोजी एजबेस्टन येथे झालेल्या पहिल्या वनडेत शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 6 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर कार्डिफच्या सोफिया गार्डन्सवर झालेल्या दुसऱ्या वनडेत यजमान इंग्लंडने शानदार पुनरागमन करत 4 गडी राखून विजय मिळवला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.
आता तिसरा वनडे सामना जिंकणारा संघ मालिकेचा विजेता ठरेल. त्यामुळे लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या निर्णायक सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेच असणार आहे.





