नवी दिल्ली । भारतीय संघाला २०१९च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. खरंतर भारतीय संघाला त्या सामन्यात ११ षटकात ११२ धावांची आवश्यकता होती. परंतु धोनी आणि केदार जाधव शेवटपर्यंत टिकूनदेखील संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले होते. आता त्या सामन्याबद्दल इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने मोठे वक्तव्य केले आहे.
स्टोक्सने भारतीय दिग्गज खेळाडूंवर केले प्रश्न उपस्थित-
त्याने मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात आपल्या संघाविरुद्धच्या सामन्यात धावा करण्याच्या भारताच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. त्याला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीची (Virat Kohli) भागीदारी ‘रहस्यपूर्ण’ वाटली. तर धोनीमध्ये ती चमक न दिसल्याचे त्याने सांगितले.
‘धोनीमध्ये ती चमक पहायला मिळाली नाही’-
स्टोक्सने आपले नवीन पुस्तक ‘ऑन फायर’मध्ये विश्वचषकाच्या त्या सामन्याचा उल्लेख केला आहे. त्यात त्याने म्हटले होते की, “धोनी जेव्हा फलंदाजीसाठी आला होता, तेव्हा भारतीय संघाला ११ षटकात ११२ धावा पाहिजे होत्या. तसेच त्याने वेगळ्याच प्रकारे फलंदाजी केली होती. तो चेंडू बाऊंड्रीच्या बाहेर पाठवण्याऐवजी एक-एक धाव घेण्यासाठी उत्सूक दिसला. भारतीय संघाला शेवटच्या १२ चेंडूतही विजय मिळवता आला असता.”
तो पुढे म्हणाला की, “धोनी (MS Dhoni) आणि केदारच्या (Kedar Jadhav) भागीदारीमध्ये ती चमक खूप कमी किंवा मग दिसलीच नाही. मला वाटते की, जर त्याने धडाकेबाज फलंदाजी केली असती तर त्याला धावा करता आल्या असत्या.”
इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्यांना वाटले की, धोनी सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकत होता. त्याने त्या सामन्यात ३१ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. परंतु अधिकतर धावा तेव्हा मिळाल्या, जेव्हा सामना भारताच्या हातातून निसटला होता, असेही तो म्हणाला.
“आमच्या ड्रेसिंग रूममध्ये धोनीच्या खेळण्याची हीच पद्धत असल्याच्या चर्चा होत होत्या. जर भारतीय संघाला सामना जिंकता आला नाही तरीही त्यांना नेट रन रेट तसाच राहील,” असेही तो म्हणाला.
‘रोहित- विराटने केला नाही दबाव टाकण्याचा प्रयत्न’-
“ज्या प्रकारे रोहित आणि विराट खेळत होते ते अगदी एका रहस्याप्रमाणे होते. मला माहित आहे की, आम्ही उत्कृष्ट गोलंदाजी केली. परंतु ज्याप्रकारे त्यांनी फलंदाजी केली ते नक्कीच कठीण वाटत होते,” असे रोहित आणि विराटबद्दल बोलताना स्टोक्स (Ben Stokes) म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, “या दोघांनीही भारतीय संघाला खूप मागे सोडले होते. त्याने आमच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला नाही. ते आमच्याच रणनीतीप्रमाणे खेळत होते.”
त्याने विराटच्या ५९ मीटर बाऊंड्रीच्या (सीमारेषा) तक्रारीला व्यर्थ म्हटले. तो म्हणाला की, “सामन्यानंतर पुरस्कार कार्यक्रमात विराटने बाऊंड्रीवर प्रश्न उपस्थित केले, त्यावेळी मला विचित्र वाटले. मी सामन्यानंतर अशाप्रकारची तक्रार यापूर्वी कधीच ऐकली नव्हती.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित






