22 ते 26 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडीज विरुद्ध भारत, श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी सामने पार पडले. या सामन्यानंतर आयसीसीने आज(27 ऑगस्ट) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
या क्रमवारीत विंडीज विरुद्ध भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्सने मोठी झेप घेतली आहे. बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 जणांमध्ये आला आहे. तर स्टोक्स अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 विकेटने जिंकलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटीत स्टोक्सने दुसऱ्या डावात नाबाद 135 धावांची खेळी केली होती. तसेच या सामन्यात त्याने 4 विकेट्सही घेतल्या.
त्यामुळे त्याने फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत 13 स्थानांची झेप घेत 13 वे स्थान मिळवले आहे. तर अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत त्याने दुसरा क्रमांक मिळवताना कारकिर्दीतील सर्वोत्तम 411 रेटिंग पॉइंट मिळवले आहेत.
तसेच बुमराहने विंडीज विरुद्ध पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात 7 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यात मदत झाली आहे. त्याने 9 स्थानांची झेप घेताना 7 वे स्थान मिळवले आहे. तसेच कारकिर्दीतील सर्वोत्तम 774 पॉइंट्स मिळवले आहेत.
त्याचबरोबर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या 6 विकेट्सच्या मदतीने 40 स्थानांची प्रगती करत 43 वा क्रमांक मिळवला आहे.
या क्रमवारी वेस्ट इंडीजचा गोलंदाज केमार रोचही 3 स्थानांनी पुढे येत 8 व्या क्रमांकवर आला आहेत . तर इंग्लंडविरुद्ध 9 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉस हेजलवूडनेही 3 स्थानांची प्रगती करत 12 वे स्थान मिळवले आहे. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानेही कारकिर्दीतील सर्वोत्तम 671 पॉइंट्स मिळवताना 21 वे स्थान मिळवले आहे.
त्याचबरोबर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो 2 स्थानांनी पुढे येत 5 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कायम आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली कायम आहे. तर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने दोन स्थानांनी प्रगती करत 6 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार जो रुट 7 व्या क्रमांकावर आला आहे.
याबरोबरच न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमने श्रीलंकेविरुद्ध केलेल्या 154 धावांच्या मदतीने 5 स्थानांची प्रगती करत 8 वे स्थान मिळवले आहे. तसेच भारताच्या अजिंक्य रहाणेने 10 स्थानांची मोठी झेप घेत 11 वे स्थान मिळवले आहे. रहाणेने वेस्ट इंडीज विरुद्ध 81 आणि 102 धावांची खेळी केली होती.
त्याचबरोबर हनुमा विहारीनेही वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या डावात 93 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्यानेही 40 स्थानांची प्रगती करत 70 वे स्थान मिळवले आहे. याबरोबर ऑस्ट्रेलिया संघात स्मिथ ऐवजी संधी मिळालेल्या मार्नस लॅब्यूशानेनेही 45 क्रमांकाची प्रगती करत 37 वे स्थान मिळवले आहे.
https://twitter.com/ICC/status/1166266609247379456
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–यूएस ओपन: भारताच्या सुमित नागलने फेडरर विरुद्ध पहिला सेट जिंकत रचला इतिहास
–वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
–बेन स्टोक्समुळे जॅक लीचला कायमस्वरुपी मिळणार मोफत चश्मा, जाणून घ्या कारण





