इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENGvsAUS) यांच्यात सध्या ऍशेस मालिका (Ashesh Series) खेळली जात आहे. इंग्लंड संघासाठी ऍशेसचा आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच दुसऱ्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघ सध्या भक्कम स्थितीत आहे. असे असले तरी, दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडच्या बेन स्टोक्स (Ben Stokes) याने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आहे. स्टोक्सने सामन्याच्या चौथ्या दिवशी एक असा अप्रतिम झेल घेतला, जो पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
त्याच्या संघाप्रमाणेच स्टोक्ससाठी देखील हा सामना निराशाजनक ठरला आहे, पण हा अप्रतिम झेल घेण्यात मात्र तो यशस्वी ठरला. त्यापूर्वी या सामन्यात स्टोक्स फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही.
दुसऱ्या डावाच्या ४६ व्या षटकात इंग्लंडचा ओली रॉबिनसन गोलंदाजी करत होता. त्याच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट मारला. यावेळी स्टोक्स त्याच दिशेला सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. हेडने मारलेला चेंडू स्टोक्सपासून लांब होता, पण तो पुढच्या दिशेने धावला आणि योग्य वेळी डाइव मारून चेंडू झेलला. स्टोक्सने घेतलेला झेल पाहून हेडसह सर्वच जण हैराण झाले होते.
https://twitter.com/muttu_ms/status/1472460807422169093?s=20
ट्रेविस हेडने ऍशेसच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघासाठी महत्वपूर्ण फलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यात त्याने शतक करून ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली होती. तर दुसऱ्या सामन्यात देखील तो चांगले प्रदर्शन करत होता, पण दुर्दैवाने स्टोक्सच्या हातून तो झेलबाद झाला. हेडने दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात एकूण ५४ चेंडू खेळले आणि यामध्ये सात चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसापासून चांगले प्रदर्शन केले आहे. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४७३ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पहिल्या डावात २३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सच्या नुकसानावर २३० धावा करून डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ४६८ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे.
महत्वाच्या बातम्या –
अरेरे! जोरदार शिंकेमुळे कोलमडली वॉर्नरची खुर्ची, पाहून घाबरले आजूबाजूचे सहकारी; व्हिडिओ व्हायरल
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतोय, “आता भारतीय बोलतील आमच्याकडे बाबर आणि रिझवान नाहीत”
बॅडमिंटनपटू श्रीकांतकडे इतिहास रचण्याची संधी! पाहा कोठे पाहता येणार विश्वविजेतेपदासाठीचा सामना