१४३ वर्षांचा इतिहास असलेला कसोटी क्रिकेट हा प्रकार सावकाश खेळासाठी ओळखला जातो. परंतु असे काही फलंदाज असतात जे आपल्या चमकदार खेळीने कसोटीतही जलद कामगिरी करतात. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सनेही सोमवारी (२० जुलै) वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात ५ व्या दिवशी एक नवीन कारनामा केला आहे. यामध्ये त्याने षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान स्टोक्सने (Ben Stokes) ५७ चेंडूंचा सामना करताना ७८ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ४ चौकार ठोकले आहेत. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.
सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंबद्दल बोलायचं झालं, तर स्टोक्सने सर्वाधिक ७४ षटकार ठोकले आहेत. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदीने (Tim Southee) ७२ षटकार ठोकले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) असून त्याने ६१ षटकार ठोकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) चौथ्या क्रमांकावर असून त्याने ५६ षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर या यादीत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचाही (Rohit Sharma) समावेश आहे. रोहितने कसोटीत एकूण ५२ षटकार ठोकले असून तो पाचव्या क्रमांकावर आहे तसेच न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरही ५२ षटकारांसह रोहितबरोबर पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
प्रथम फलंदाजी करताना स्टोक्स (१७६) आणि डॉम सिब्ले (१२०) या खेळाडूंच्या शतकी खेळीच्या मदतीने इंग्लंड संघाने आपला डाव ९ बाद ४६९ धावांवर घोषित केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २८७ धावांवर सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे इंग्लंडला १८२ धावांची आघाडी मिळाली होती.
त्यानंतर बेन स्टोक्सच्या दुसऱ्या डावातील ७८ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजसमोर ३१२ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु वेस्ट इंडिज संघाचा डाव केवळ १९८ धावांवर संपुष्टात आल्याने इंंग्लंडने ११३ धावांनी विजय मिळविला तसेच मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बेन स्टोक्स अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; मालिकेत साधली बरोबरी
-प्रशिक्षणादरम्यान न्यूझीलंडच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाची प्रकृती बिघडली
-टी२० विश्वचषक आयसीसीने ढकलला पुढे, आयपीएल आयोजनाचा मार्ग झाला मोकळा