गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सुपर संडेच्या दुसऱ्या लढतीत संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने कट्टर प्रतिस्पर्धी केरला ब्लास्टर्सचा 4-2 असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह बेंगळुरूने गुणतक्त्यात चौथा क्रमांक गाठला.
स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ अपराजित असला तरी याआधीच्या लढतींमध्ये त्यांचा खेळ लौकीकाला साजेसा झाला नव्हता. त्यादृष्टिने ही कामगिरी चाहत्यांचा आनंद द्विगुणीत करणारी ठरली. क्लेईटन सिल्वा, एरीक पार्टालू, डिमास डेल्गाडो आणि सुनील छेत्री यांनी गोल केले. बेंगळुरूचा संघ प्रारंभी पिछाडीवर होता, पण मध्यंतरास त्यांनी बरोबरी साधली. मग दुसऱ्या सत्राच्या प्रारंभीच अनुभवी सुनील छेत्रीने पेनल्टी दवडली होती. त्यानंतरही बेंगळुरूने भक्कम मनोधैर्याच्या जोरावर विजय नोंदवला.
अपराजित बेंगळुरूचा 5 सामन्यांतील हा दुसराच विजय असून तीन बरोबरींसह त्यांचे नऊ गुण झाले. एफसी गोवा (5 सामन्यांतून 8) मागे टाकत बेंगळुरूने गुणतक्त्यात एक क्रमांक प्रगती करीत पाचवरून चौथे स्थान गाठले. बेंगळुरूचे आता नऊ गोल झाले असून सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत त्यांनी मुंबई सिटी एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (प्रत्येकी 8) यांना मागे टाकले. या लढतीपूर्वी बेंगळुरूच्या खात्यात पाचच गोल होते.
ब्लास्टर्सची पहिल्या विजयाची प्रतिक्षा लांबली. 5 सामन्यांत त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला. दोन बरोबरींसह त्यांचे दोन गुण व 11 संघांमध्ये शेवटून तिसरे म्हणजे नववे स्थान कायम राहिले. विजयाचे खाते अद्याप उघडू न शकलेल्या संघांमध्ये ब्लास्टर्स, ओदिशा एफसी आणि एससी ईस्ट बंगाल यांचा समावेश आहे.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मध्यंतरास दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 1-1 अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात बेंगळुरूने तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत पकड घेतली होती. त्यानंतर ब्लास्टर्सने पिछाडी कमी केली, पण सुनील छेत्रीने संघाचा चौथा गोल नोंदवला.
ब्लास्टर्सने सामन्याची सुरवात सनसनाटी करीत खाते उघडण्याची शर्यत जिंकली. 17व्या मिनिटाला गॅरी हुपरने साधारण 60-70 यार्ड अंतरावरून आगेकूच केली. त्याने उजवीकडे राहुलला पास दिला. राहुलने चेंडूवर नियंत्रण मिळवत बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूला चकवले.
बेंगळुरूने 29व्या मिनिटाला बरोबरी साधली. गुरप्रीतने ब्लास्टर्सच्या क्षेत्रात चेंडू टाकला. ब्लास्टर्सचा निशू कूमार आणि बेंगळुरूचा ओप्सेथ यांच्यात चेंडूवरील ताब्यासाठी चुरस झाली. निशूचे हेडिंग चुकले. त्यामुळे चेंडू ब्लास्टर्सच्याच गोलक्षेत्रात गेला. त्यावेळी बचावपटू लालरुथ्थारा याचाही अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू सिल्वा याच्या दिशेने गेला. सिल्वाने मग ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्सला चकवले.
दुसरे सत्र सनसनाटी ठरले. प्रारंभीच ब्लास्टर्सचा बचावपटू बाकारी कोने याने बेंगळुरूचा स्ट्रायकर क्रिस्तीयन ओप्सेथला पाडले. त्यामुळे रेफरी क्रिस्टल जॉन यांनी बेंगळुरूला पेनल्टी बहाल केली. त्यावर सुनील छेत्रीने मारलेला चेंडू थेट गोम्स याच्या ग्लोव्हजमध्ये स्थिरावला. त्यावेळी छेत्रीला निराशा लपवता आली नाही. 49व्या मिनिटाला बसलेल्या या धक्क्यातून बेंगळुरू लगेच सावरला. 51व्या मिनिटाला युवा स्ट्रायकर आशिक कुरुनीयन याने दिलेल्या अप्रतिम क्रॉस पासवर डावीकडून क्लेईटन सिल्वाने आगेकूच केली. त्याने दिलेल्या पासवर ओप्सेथने चेंडू नेटच्या दिशेने मारला. हा चेंडू पार्टालू याच्या नडगीला लागून नेटमध्ये गेला.
त्यानंतर दोन मिनिटांत बेंगळुरूने आघाडी वाढवली. गोम्सने लालरुथ्थारा याच्या दिशेने फेकलेला चेंडू क्लेईटन सिल्वाने चपळाईने आणि कौशल्याने आपल्या ताब्यात घेतला. त्याने ओप्सेथच्या दिशेने चेंडू मारला. त्यावेळी डेल्गाडो यानेही साथ देत धाव घेतली. पास मिळताच त्याने गोम्स याच्या डावीकडून चेंडू नेटमध्ये घालवला. डेल्गाडोच्या ताकदवान फटक्यामुळे गोम्सला हालचाल करण्याचीही संधी मिळाली नाही.
संबंधित बातम्या:
– आयएसल २०२०: चेन्नईयीनला रोखत नॉर्थईस्ट अपराजित
– आयएसएल २०२०: अँग्युलोच्या गोलमुळे ओदिशाला हरवून गोव्याची आगेकूच
– आयएसएल २०२०: जमशेदपूरला रोखत ईस्ट बंगालने उघडले खाते