आयपीएल २०२० च्या हंगामाची मंगळवारी अखेर झाली. या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मिळवले. हा हंगाम अनेक गोष्टींमुळे चर्चेत आला. अनेकदा खेळाडूंनी फलंदाजीमध्ये चमक दाखवली. तर अनेकदा गोलंदाजांनी फलंदाजांच्या दांड्या गुल करत वाहवा मिळवली. एवढेच नाही तर यंदा खेळाडूंकडून शानदार क्षेत्ररक्षणाचेही प्रदर्शन अनेक खेळाडूंनी केले.
या हंगामात क्रिकेट चाहत्यांना अनेक अफलातून झेल पहायला मिळाले. या हंगामात अनेक खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी करताना एकहाती झेल घेत, तसेच बाऊंड्री लाईनवर झेल घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यातील काही खास ५ झेलाबद्दल या लेखात जाणून घेऊ.
१. पोलार्डचा शानदार एकहाती झेल
७ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात कायरान पोलार्ड याने सीमारेषेजवळ एक जबरदस्त झेल घेतला. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने टाकलेल्या १४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर बटलरने हवेत फटका मारला. त्यावेळी सीमारेषेजवळ उभा असलेल्या पोलार्डने हवेत उडी घेऊन एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पहिल्या प्रयत्नात तो झेल घेऊ शकला नाही, तरीही चेंडू हातातून खाली पडण्यापूर्वी पोलार्डने कसाबसा पकडला. त्याच्या या झेलचे सचिन तेंडुलकरनेही कौतुक केले होते.
२. फॅब्यूलस फाफ –
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएलचा ४४ वा सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसने शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज पड्डीकलने मिशेल सँटेनर टाकत असलेल्या ७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र लाँग ऑनला गेलेला तो चेंडू डू प्लेसिसने पळत येऊन पकडला. पण त्याचा बाऊंड्री लाईनला स्पर्श होईल, म्हणून त्याने चपळाईने तो चेंडू जवळच असलेल्या ऋतुराजकडे फेकला. ऋतुराजनेही कोणतीही चूक न करता तो चेंडू झेलला. त्यामुळे पड्डीकलला २२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
What an amazing catch #faf ❤️❤️❤️#CSK pic.twitter.com/QSFitjF8R6
— ★ 𝘗𝘙𝘈𝘉𝘏𝘈𝘒𝘈𝘙 ★ (@manasaatche) October 25, 2020
३. दिनेश कार्तिकने एकाच हाताने घेतला भन्नाट झेल –
१ नोव्हेंबरला दुबईच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघात हंगामातील रंगतदार लढत झाली. या लढतीत कोलकाताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अप्रतिम झेल पकडला. बेन स्टोक्सने पॅट कमिन्सच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटला कडेला लागला. अशात यष्टीमागे उभा असलेल्या कार्तिकने वेगाने डाव्या बाजूला झेप घेतली आणि स्टोक्सने मारलेला तो चेंडू झेलला. कार्तिकच्या त्या अनपेक्षित झेलला पाहिल्यानंतर संघातील इतर खेळाडूंचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता.
"Catches win Matches" 🌟🌟🌟
Has to be one of the finest catch of IPL 2020. What a catch from Dinesh Karthik. #KKRvRR #KKR #VakeelSaab #IPL2020 #RR pic.twitter.com/21Z3DFYqYM
— Siva Harsha (@SivaHarsha_23) November 1, 2020
४. आर्चरने घेतलेला झेल पाहून सगळ्यांच्याच बत्त्या झाल्या गुल –
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स संघांत झालेल्या आयपीएल २०२० च्या ४५ व्या सामन्यात मुंबईचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशनचा झेल राजस्थानचा धिप्पाड खेळाडू जोफ्रा आर्चरने घेतला. या सामन्यात किशनने १२ व्या षटकातील ४था चेंडू बाऊंड्रीच्या दिशेने टोलवला. हे षटक कार्तिक त्यागी टाकत होता. त्याचा फटका पाहून हा नक्कीच षटकार जाईल असे वाटले. परंतु तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या जोफ्रा आर्चरने आपल्या उंचीचा फायदा घेत उडी मारली तसेच एक हाताने अविश्वसनीय झेल झेलला आणि मुंबईच्या किशनला पव्हेलियनचा रस्ता धरण्यास भाग पाडले. आर्चरचा झेल पाहून गोलंदाज त्यागी आणि क्षेत्ररक्षक रियान परागही आश्चर्यचकित झाले.
Wicket of Ishan Kishan catch by Jofra Archer #NowIsWow Moment Today match. @GodrejAppliance pic.twitter.com/vrWN2T9QfD
— Sarika Porwal (@porwal_sarika) October 25, 2020
५. सीमारेषेजवळ जडेजाने घेतला अप्रतिम झेल –
या आयपीएल हंगामातील २१वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि फाफ डू प्लेसिस यांनी कोलकाताच्या सुनील नरेनचा खूप अनोखा आणि अप्रतिम झेल पकडला.
Stunning catch by jaddu n Faf 🔥💯.
World's top 2 fielders @imjadeja @faf1307 #CSKvsKKR #jadeja #FafduPlessis pic.twitter.com/uztjldNtVo— Sanket Bhavar (@SanketBhavar4) October 7, 2020
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने डावातील ११वे षटक टाकण्यासाठी कर्ण शर्माला पाठवले. शर्माच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नरेनने शॉट मारला. पण मीड विकेटकडे उभा असलेल्या रविंद्र जडेजाने कमालीची डाइव्ह घेत चेंडू पकडला. पण घसरत त्याचा हात सीमारेषेला स्पर्श करेल तोपर्यंत त्याने समोर उभा असलेल्या फाफ डू प्लेसिसकडे चेंडू फेकला आणि त्याने चेंडू पकडत नरेनला झेलबाद केले.