भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे तिसऱ्या कसोटीला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय फसला आणि इंग्लंडचा पहिला डाव दुसऱ्या सत्रातच ११२ धावांवर संपुष्टात आला. भारतातर्फे फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक ६ बळी आपल्या नावे केले. यासह, अक्षरने एका खास विक्रमाला गवसणी घातली.
अक्षरने गुंडाळला इंग्लंडचा डाव
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून मान मिळवलेल्या अहमदाबादच्या मोटेरा येथील स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला. दिवस-रात्र स्वरूपाच्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या फिरकीपटूंनी दर्जेदार गोलंदाजी करत इंग्लंडला ११२ धावांवर बाद केले. भारताकडून ‘लोकल बॉय’ अक्षर पटेल याने सर्वाधिक ६ तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने तीन बळी आपल्या नावे केले. आपला १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांत शर्माने एक बळी मिळविला.
अक्षरच्या नावे जमा झाला विक्रम
इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ बळी मिळवणाऱ्या अक्षर पटेलने या सहा बळी एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. भारताकडून दिवस-रात्र कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानी आला आहे. अक्षरने बुधवारी ३८ धावा देऊन ६ गडी गारद केले.
यापूर्वी, भारताकडून दिवस-रात्र कसोटीत सर्वात्तम गोलंदाजी इशांत शर्माने केली होती. इशांतने बांगलादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत पहिल्या डावात २२ धावा देऊन ५ गडी बाद केले होते. तसेच, यात सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवने ५३ धावा खर्च करत ५ बांगलादेशी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला.
भारतातील दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना
अहमदाबाद येथे सुरू झालेला भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचा दिवस-रात्र कसोटी सामना भारतातील केवळ दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. भारतातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना २०१९ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
द्विशतक आणि २४ फेब्रुवारीचा आहे ‘याराना’
शंभर कसोटी खेळणारा इशांत ११ वा भारतीय; पाहा कोणत्या देशाचे सर्वाधिक खेळाडू खेळलेत १०० कसोटी सामने
Ind vs Eng : यजमानांच्या तिखट माऱ्यासमोर पाहुण्यांची त्रेधातिरपीट, नावे झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम