भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. भुवनेश्वर कुमारला श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमारने मार्च महिन्यामध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्ध टी20 मालिकेतून भारतीय संघात दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन केले होते. परंतु, तरीदेखील भुवनेश्वर कुमारची इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कसोटी संघामध्ये निवड झाली नाही. यासंदर्भात भुवनेश्वर कुमारने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तिथ यजमान संघाविरुद्ध त्यांना 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचवेळी भारताचा मर्यादीत षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. भुवनेश्वर कुमारची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे, मात्र त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळालेली नाही, त्यामुळे भुवनेश्वरकडे कसोटी सामन्यांसाठी दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिली होती
काही दिवसांपूर्वीच असे वृत्त आले होते की, भुवनेश्वरला कसोटी क्रिकेटमध्ये खेळायचे नाही. पण आता भुवनेश्वरने सांगितले आहे की, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळायची अजूनही इच्छा आहे. भुवनेश्वर म्हणाला की, त्याचे लक्ष फक्त क्रिकेट खेळण्यावर आहे.
यासंदर्भात भुवनेश्वर म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर माझ्यासाठी सर्वच स्वरुपातील क्रिकेट सारखेच आहे. मग तो मर्यादित षटकांच्या सामना असो किंवा मग कसोटी सामना असो. जर माझी कसोटी सामन्यासाठी निवड झाली आणि जर मी संघाचा भाग असेल तर निश्चितच मी योगदान देण्याचा प्रयत्न करेन.”
भारत आणि श्रीलंका संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून पहिला एकदिवसीय सामना रविवार 18 जुलै रोजी पार पडणार आहे. यासंदर्भात भुवनेश्वर म्हणाला की, “मी सर्वच क्रिकेट स्वरूपाला समान स्थान देतो. त्यामुळे सर्वच स्वरुपातील क्रिकेटसाठी मी सराव करतो.”
भुवनेश्वर कुमार 2018 पासून कसोटी क्रिकेट पासून दूर
इंग्लंड संघानंतर पुढील कसोटी मालिका न्युझीलंड संघाविरुद्ध घरच्या मैदानावर भारताला खेळायची आहे. यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकांमध्येतरी भुवनेश्वर कुमारला संधी मिळणार का हे पाहावे लागणार आहे. भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळला होता. त्यानंतर भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात संधी मिळालेली नाही.
श्रीलंका दौऱ्यात उपकर्णधारपदाची भूमिका पार पाडणार
अनेक वरिष्ठ खेळाडू भारतीय कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेले असल्याने श्रीलंका दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे, तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे आहे. आता या दौऱ्यात भुवनेश्वर कुमार कशी कामगिरी करतो हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका वि. भारत: दोन्ही संघांना खुणावतायेत नवे विक्रम; शिखर करू शकतो ‘हा’ पराक्रम
‘न भूतो’! अखेरच्या षटकात सलग सहा षटकार ठोकत ‘या’ खेळाडूने संघाला मिळवून दिले विजेतेपद
भारतीय संघ डरहॅमला आले एकत्र; रोहित म्हणाला, ‘सुटी संपली, आता कामाला सुरुवात’