मुंबई । आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना चारी मुंड्या चित करणारा भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातला महत्वाचा खेळाडू आहे. सामन्याच्या सुरुवातीला स्विंग आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर आणि नकल बॉल टाकून फलंदाजांना अडचणीत आणतो.
आयपीएलमध्ये ही तो पैसा वसूल कामगिरी करतो. सर्वसामान्य घरातून पुढे आलेला भूवी आज करोडपती झाला आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याला पहिल्यांदा किती रुपयांचा चेक मिळाला होता हे सांगितले.
भुवनेश्वर कुमार फॅनच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला की, “मला पहिल्यांदा तीन हजार रुपयांचा चेक मिळाला होता. त्या पैशातून मी शॉपिंग केलो तर उर्वरित रक्कम राखून ठेवली होती.”
डेथ ओव्हर्समध्ये कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करायला भीती वाटते असा प्रश्न एका फॅनने भूवीला विचारला. यावर तो म्हणाला, “मला कोणत्याही फलंदाजास गोलंदाजी करायला भीती वाटत नाही. पण मी त्यांचा सन्मान करतो.”
भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये ख्रिस गेलसारख्या खतरनाक फलंदाजांची बोलती आपल्या धारदार गोलंदाजीने बंद केली होती.
चेंडूवर लाळ लावण्यास प्रतिबंध घालण्यात आलेल्या नियमांवर बोलताना तो म्हणाला, “जगातल्या सर्वच मैदानावर गोलंदाजी करताना घाम येत नाही. त्यावर आयसीसीने विचार करायला हवा. सर्व परिस्थिती लवकरच बदलेल, अशी अपेश्रा आहे.”
भूवीने भारताकडून 21 कसोटी सामने, 114 वनडे सामने आणि 43 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत 63 विकेट्स, वनडेत 132 विकेट्स आणि टी20 त 41 बळी घेतल्या आहेत.