गेल्या काही वर्षात जगभरात काही उत्तम वेगवान गोलंदाज पाहायला मिळाले. सध्याच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्कबरोबरच दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाचेही नाव घेतले जाते. त्याने गेल्या काही वर्षात रबाडाने दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची धूरा सांभाळली आहे. आज याच रबाडाचा २६ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या क्रिकेटमधील प्रवासाचा घेतलेला आढावा.
डॉक्टर वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळू लागला क्रिकेट
वंशभेदाच्या कारणाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तब्बल २१ वर्ष निलंबित केले होते. जेव्हा ही बंदी उठवण्यात आली; तेव्हा अनेक कृष्णवर्णीय क्रिकेटपटूंना, राष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळण्यास सुरुवात झाली. मखाया एंटिनी हा दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणारा पहिला कृष्णवर्णीय क्रिकेटपटू बनला. तेव्हापासूनच जोहान्सबर्गमधील एम्फो रबाडा या कृष्णवर्णीय डॉक्टरांनी ठरवले की, आपल्या मुलाला देखील क्रिकेटपटू बनवायचे. एम्फो यांनी त्या दिशेने आपला मुलगा कागिसोला प्रयत्न करण्यासाठी भाग पाडले. कागिसोला क्रिकेटपेक्षा रग्बी खेळण्याची अधिक आवड होती. मात्र, १२ वर्षाचा असताना शाळेच्या रग्बी संघात त्याची निवड झाली नाही आणि तो क्रिकेटकडे वळाला. वडील डॉक्टर व आई वकील असल्याने त्यांना तितकासा वेळ मिळत नसायचा. तेव्हा, कागिसो स्वतः क्रिकेटच्या मैदानावर मेहनत घेत.
कागिसो जन्मत: डावखुरा होता. आपली दैनंदिन कामे तो डाव्या हाताने करायचा. मात्र, मैदानावर उतरल्यावर तो गोलंदाजी उजव्या हाताने करू लागला. उजव्या हाताने गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो म्हणून, त्याच्या सहकाऱ्यांना त्याचे कौतुक वाटत. कागिसो अवघ्या दोन वर्षात उत्तम गोलंदाजी करायला लागला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी तो अतिशय वेगात चेंडू फेकायचा.
कागिसोचे वडील एम्फो कागिसोच्या लहानपणीची एक आठवण सांगतात, “तो १४ वर्षाचा होता. तेव्हा त्याच्या शाळेच्या संघाला विजय मिळवण्यासाठी अवघ्या एका बळीची आवश्यकता होती. मात्र, पाऊणतास कोणताच गोलंदाज तो अखेरचा बळी घेऊ शकला नाही. अखेरीस, कागिसोने चेंडू हातात घेतला आणि त्या फलंदाजाच्या दांड्या उडवल्या. तो चेंडू पाहून उपस्थित असलेले सर्वजण अवाक् झाले होते. कारण, यष्टी सहा-सात वेळा पलटी मारून पडली होती.”
ग्रँट एलियट आणि मायकल लंबच्या शाळेतील विद्यार्थी
कागिसो जोहान्सबर्गमधील सेंट स्तितीयन कॉलेज या शाळेत शिकला. या शाळेचे दोन माजी विद्यार्थी म्हणजे न्यूझीलंडचा ग्रॅंट एलियट व इंग्लंडचा मायकल लंब हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते. कागिसो जोहान्सबर्गमधील शालेय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून पुढे येत होता. १८ वर्षाचा होईपर्यंत त्याच्या गोलंदाजीला वेगळीच धार चढलेली.
दुबईतून मिळाली होती आंतरराष्ट्रीय पटलावर ओळख
वयाच्या अठराव्या वर्षी त्याची निवड गॉटेन संघात झाली. दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाची एकदिवसीय स्पर्धा असलेल्या प्रोवेंशियन कपमधून त्याने वरिष्ठ स्तरावरील आपला पहिला सामना खेळला. त्याचवेळी त्याची निवड २०१४ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात झाली. हा विश्वचषक युएईत आयोजित केला गेला होता. ‘कागिसो रबाडा’ हे नाव क्रिकेट जगताला कळण्यासाठी ही स्पर्धा पुरेसी होती. रबाडाने स्पर्धेत १४ बळी आपल्या नावे केले. ज्यामध्ये त्याचा इकॉनोमी रेट फक्त ३.१० एवढाच होता. दक्षिण आफ्रिकेने दुबईत झालेल्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करत त्या विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. याच विश्वचषकात ‘जगातील सर्वात धोकादायक गोलंदाज’ अशी उपाधी रबाडाला मिळाली होती.
प्रथमश्रेणी पदार्पणात मोडला डेल स्टेनचा विक्रम
रबाडाच्या विश्वचषकातील कामगिरीमुळे स्थानिक संघ हायवेल्ड लायन्सने त्याच्याशी करार केला. रबाडाने लायन्सकडून पहिला प्रथमश्रेणी सामना खेळताना डॉल्फिन संघाविरुद्ध पहिल्या डावात ३३ धावांत ९ बळी मिळवण्याची कामगिरी केली. संपूर्ण सामन्यात त्याने १०५ धावा देत १४ बळी आपल्या नावे केले. एका सामन्यात ११० देऊन १४ बळी मिळवण्याचा, डेल स्टेनचा राष्ट्रीय विक्रम त्याने मोडीत काढलेला. रबाडाची सातत्यपूर्ण कामगिरी पाहताना लवकरच त्याला राष्ट्रीय संघात निवडले गेले.
टी२० पदार्पणात मॅक्सवेलला भोपळाही फोडू दिला नाही.
नोव्हेंबर २०१४ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामन्यातून त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यावेळचा सर्वोत्तम टी२० फलंदाज असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला पहिल्या चेंडूवर बाद करण्याची कामगिरी त्याने केली होती. टी२० पदार्पणाप्रमाणेच त्याचे एकदिवसीय पदार्पण देखील विक्रमी राहिले. रबाडाने बांगलादेशविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला.
एकदिवसीय पदार्पणात हॅट्रिकचा पराक्रम
मिरपूर येथे २०१५ साली बांगलादेशविरुद्धच्या आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील दुसऱ्या षटकात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम त्याने केला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर तमिम इक्बाल, चौथ्या चेंडूवर लिटन दास व पाचव्या चेंडूवर महमदुल्ला यांना बाद करत त्याने आपली हॅट्रिक पूर्ण केली. पदार्पणात हॅट्रिक घेणारा तो दुसरा खेळाडू होता. जेपी डुमिनी व चार्ल्स लैंग्वेल्ट यांच्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय हॅट्रीक घेणारा तो अवघा तिसरा गोलंदाज बनलेला. त्या सामन्यात रबाडाने सहा बांगलादेशी फलंदाजांची शिकार केली होती.
धोनीवरील टीकेला कारणीभूत होता रबाडा
ऑक्टोबर २०१५ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या, दक्षिण आफ्रिका संघात रबाडाचा समावेश होता. त्या दौऱ्यात त्याने वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्धी मिळवली. कानपूर येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १० धावांची गरज होती. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार व सर्वोत्कृष्ट फिनिशर अशी ख्याती असणारा एमएस धोनी स्ट्राईकवर होता. रबाडाने त्या षटकात धोनीला आखूड टप्प्याचे चेंडू टाकत हैराण केले. सोबतच, चौथ्या चेंडूवर त्याने धोनीला बाद करत; दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकून दिला. याच घटनेनंतर, धोनीच्या सामना संपवण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली होती.
दोन वर्षात मिळवले १२ पुरस्कार
२०१६ हे वर्ष रबाडासाठी भाग्यशाली ठरले. याचवर्षी त्याने काऊंटी क्लब केंटसोबत करार केला. २०१६ व २७ अशी सलग दोन वर्षे त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये आपली छाप सोडली. दोन वर्षात तब्बल बारा पुरस्कार त्याने आपल्या नावे केले. २०१६ मध्ये त्याने सर्वप्रथम कसोटी क्रिकेटमध्ये, दोन्ही डावात मिळून १३ बळी मिळवण्याची कामगिरी केली.
बावीसाव्या वर्षी पोहोचला गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी
इंग्लंडविरुद्ध २०१७ च्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चार बळी मिळवत; तो एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. सर्वात कमी वयात अव्वलस्थानी पोहचण्याचा विक्रम रबाडाच्या नावे जमा झाला. ज्यावेळी रबाडाने ही कामगिरी केली; तेव्हा त्याचे वय अवघे २२ वर्ष होते. रबाडाने अवघ्या ३१ कसोटी सामन्यात १५० बळी मिळवण्याचा विश्वविक्रम देखील केला आहे.
आयपीएलमध्ये केली सातत्यपूर्ण कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असताना, २०१७ आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने पाच कोटी रुपयांची बोली त्याच्यावर लावली. तो स्पर्धेत फक्त ६ सामने खेळू शकला. या सहा सामन्यात त्याला ६ बळी घेण्यात यश आले. २०१८ आयपीएलसाठी दिल्लीने त्याला संघात कायम राखले. मात्र, दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामाला मुकला. २०१९ आयपीएलमध्ये पुनरागमन करताना त्याने १२ सामन्यात २५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दिल्ली कॅपिटल्सला सात वर्षानंतर, प्लेऑफसाठी पात्र करण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. रबाडाने आत्तापर्यंत ४२ आयपीएल सामने खेळले असून १९.३० च्या सरासरीने ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
ऍलन डोनाल्ड, मखाया एंटिनी, डेल स्टेन, मॉर्नी मॉर्कल या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांची परंपरा पुढे नेणारा रबाडाने दक्षिण आफ्रिकेसाठी आत्तापर्यंत ४५ कसोटी खेळताना २०२ बळी मिळवून दिले आहेत. सोबतच, ७७ एकदिवसीय व २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्याने अनुक्रमे ११९ व ३१ बळी आपल्या नावे केले आहेत. यापूढेही दक्षिण आफ्रिकेला त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
वाचा –
‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग
मैदानावर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सचिनचं ‘या’ व्यक्तीपुढे झालं होतं अवघड