1नोव्हेंबर, 1974 मध्ये जन्मलेला भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणचा आज 48 वा वाढदिवस आहे. त्याने 16 वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मधल्या फळीतील उत्कृृष्ट फलंदाज असणारा लक्ष्मण हा सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासोबत भारताच्या ‘फॅब-फोर’चा भाग होता.
त्याच्या फलंदाजीच्या तंत्रामध्ये एक नैसर्गिकता आणि अभिजातता होती. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेल्या 10 खेळाडूंपैकी लक्ष्मण देखील एक आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख मिळवणाऱ्या लक्ष्मणबद्दल या आहेत खास गोष्टी –
-ऑस्ट्रेलियाविरुद्ध बऱ्याचदा चांगला खेळ केलेल्या लक्ष्मणने एका मुलाखतीत सांगितले होते की कदाचित ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण असे नाव दिले आहे.
-लक्ष्मण लहान असताना तो त्याचे मामा बाबा कृष्णमोहन यांना क्रिकेट खेळताना आवडीने पाहायचा. ते हैदराबादमध्ये क्लब क्रिकेटर होते. बाबा कृष्णमोहन यांनीच टेनिस-बाॅल क्रिकेट खेळत असताना लक्ष्मणमधील प्रतिभा हेरली. त्यामुळे त्यांनी लक्ष्मण केवळ सात वर्षांचा असताना त्याला सेंट जॉन कोचिंग कँपमध्ये दाखल केले.
काही दिवसांनंतर त्याचे मामा बाबा कृष्णमोहन यांनी त्याचठिकाणी बॅकयार्डमध्ये टेनिस-बाॅल क्रिकेट खेळताना त्याच्यातील प्रतिभा पाहिली.
-लक्ष्मण हा क्रिकेट खेळण्याबरोबरच अभ्यासातही उत्कृष्ट होता. त्याने 10वी च्या बोर्डाच्या परीक्षेत 98% टक्के गुण मिळवले होते. तसेच त्याचे वडील डॉ. शांताराम आणि आई डॉ. सत्यभामा हे प्रख्यात डॉक्टर्स आहेत. त्यामुळे त्यानेही वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. पण त्याने क्रिकेटसाठी त्याचे वैद्यकीय शिक्षण सोडले.
-भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे लक्ष्मणचे पणजोबा आहेत.
-फेब्रुवारी 1987 मध्ये लक्ष्मणने वयोगटातील क्रिकेट खेळत असताना पहिले शतक केले. 13 वर्षाखालील गटात खेळताना त्याने हैदराबादकडून आंध्रप्रदेश विरुद्ध विजयवाडा येथे झालेल्या सामन्यात 153 धावा केल्या होत्या.
https://twitter.com/ICC/status/793301543126642688
-ऑस्ट्रेलियाला नेहमीच भारी पडणाऱ्या लक्ष्मणने 1994 मध्ये 19 वर्षांखालील भारतीय कसोटी संघात पदार्पणही ऑस्ट्रेलिया विरुद्धच केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघात ब्रेट ली आणि जेसन गिलेस्पी यांसारखे गोलंदाज होते. त्यांच्या विरुद्ध खेळताना त्याने पदार्पणाच्या डावात 88 धावा केल्या.
-त्याच्या पुढील सामन्यात लक्ष्मणने पहिल्या डावात 151 धावा तर दुसऱ्या डावात 77 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला 226 धावांनी विजय मिळाला. 3 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत लक्ष्मणने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 110.25 च्या सरासरीने 441 धावा केल्या होत्या.
-लक्ष्मणने 1992 – 93च्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. तो हैदराबादकडून पंजाबविरुद्ध खेळताना पहिल्या डावात शुन्यावर तर दुसऱ्या डावात 17 धावांवर बाद झाला.
https://twitter.com/ICC/status/660667615140974592
-लक्ष्मण आणि शुन्यावर बाद होण्याचा अनोखा संबंध आहे. तो फक्त प्रथम श्रेणीच्या पदार्पणाच्या डावात शुन्यावर बाद झाला असे नाही तर वनडे पदार्पणाच्या सामन्यात आणि कारकिर्दीतील शेवटच्या वनडे सामन्यातही तो शुन्यावर बाद झाला.
-लक्ष्मणला कसोटी कारकीर्दीमध्ये चांगली सुरुवात मिळाली. 1996 मध्ये त्याने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यात त्याने पहिल्या डावात 11 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात कठीन खेळपट्टीवर खेळत त्याने 51 धावा केल्या. त्याच्या या खेळीने भारताच्या 64 धावांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
– 2001 मध्ये कोलकातामधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात लक्ष्मणच्या कारकीर्दीला वेगळे वळण मिळाले. हा मालिकेतील दुसरा कसोटी सामना होता आणि भारत या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर होता. स्टीव्ह वॉचा ऑस्ट्रेलिया संघ सलग 17वा कसोटी सामना जिंकण्याच्या इराद्याने या सामन्यात उतरले होते.
तसेच त्यांनी पहिल्या डावात 274 धावांची आघाडी घेत त्या दिशेने पाऊलही टाकले होते. त्याचबरोबर भारताला त्यांनी फॉलोऑन दिला होता. पण लक्ष्मणने दुसऱ्या डावात 281 धावांची खेळी करत भारताला हा सामना जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
त्याने या डावात राहुल द्रविड बरोबर तब्बल 374 धावांची भागीदारी रचली होती. आजही क्रिकेट चाहते लक्ष्मणच्या या खेळीला आणि त्याने द्रविडबरोबर केलेल्या त्या भागीदारीला विसरलेले नाहीत.
https://twitter.com/BCCI/status/1189972806009647104
-लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 29 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 49.67च्या सरासरीने 2434 धावा केल्या. तो भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 21 वनडे सामन्यांत 46.18च्या सरासरीने 739 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याच्या 17 कसोटी शतकांपैकी 6 कसोटी शतके आणि 6 वनडे शतकांपैकी 4 शतके त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केली आहेत. तसेच त्याच्या कसोटीतील दोन्ही द्विशतकेही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातच केली आहेत.
https://twitter.com/ICC/status/925542926398173184
– हैदराबाद हे विशेषत: ‘दम बिर्याणी’साठी प्रसिद्ध आहे. परंतु, हैद्राबादचा असणारा लक्ष्मण कट्टर शाकाहारी आहे. त्याला घरगुती जेवण आणि दाक्षिणात्य पद्धतीने बनविलेले ‘रस्सम’ आवडते.
-भारतासाठी 134 कसोटी सामने खेळणाऱ्या लक्ष्मणला मात्र 16 वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही विश्वचषकात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
– लक्ष्मणने कारकिर्दीत 134 कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये त्याने 45.97च्या सरासरीने 8781 धावा केल्या. यामध्ये त्याने 17 शतके ठोकली.
https://twitter.com/ICC/status/1190131354954063872
-लक्ष्मणने कंप्यूटर सायन्समध्ये पदवीधर झालेल्या जीआर शैलजा बरोबर 2004मध्ये विवाह केला. त्यांना सर्वजीत नावाचा मुलगा आणि अचिंता नावाची मुलगी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला






