भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसाठी आजचा दिवस खास आहे. कारण त्याचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. चहलचा जन्म 23 जुलै 1990 रोजी हरियाणामधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता आणि तो आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचे वडील केके चहल वकील आहेत आणि 2002-03 मध्ये ते जींद बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्याशिवाय ते 1983 मध्ये दारियावली गावचे सरपंच आणि 1984 मध्ये बाजार समितीचे अध्यक्ष होते. या लेखात चहलशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊयात.
युझवेंद्र चहल याची आई सुनीता देवी या गृहिणी आहेत. चहलच्या दोन मोठ्या बहिणी असून त्या ऑस्ट्रेलियामध्ये राहतात, तर चहल कुटुंबातील सर्वात धाकटा आहे. चहल हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने क्रिकेट व बुद्धिबळ या दोन्ही खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून त्याने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याने 12 वर्षाखालील नॅशनल किड्स चेस चॅम्पियनशिप देखील जिंकली आणि त्याव्यतिरिक्त तो 16 वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेतही सहभागी झाला आहे.
चहलच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट टप्पा 2006 मध्ये आला जेव्हा त्याने आपल्या बुद्धिबळ खेळासाठी प्रायोजक मिळणे बंद झाले. त्याच्यासमोर सर्वात मोठी पैशाची समस्या आली होती. चेस हा एक खेळ होता, ज्यात ते दरवर्षी 50 ते 60 हजार खर्च व्हायचे. या खेळासाठी तो इतका पैसा कसा उभारायचा ही चहलसमोरची समस्या होती. म्हणूनच चहलने निर्णय घेतला की यापुढे तो हा खेळ खेळणार नाही आणि त्याने या खेळाला कायमचा रामराम ठोकला.
साल 2009 मध्ये 19 वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीने त्याने सर्वाधिक 34 बळी घेतले होते. यामुळे तो मोठ्या खेळाडूंच्या नजरेत आला आणि त्याला संधी मिळू लागल्या. साल 2011 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स लीग टी20 मध्ये चहलला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळाले आणि त्याने यात कारनामा करून दाखविला. अंतिम सामन्यात त्याने नऊ धावांत दोन गडी बाद केले आणि मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चहलने 11 जून 2016 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने 18 जून 2016 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 करियरमध्ये पदार्पण केले होते. चहलने इंग्लंडविरुद्ध बेंगलोर टी20 सामन्यात 25 धावा देऊन 6 बळी घेतले होते. त्यावेळी टी20 क्रिकेटमध्ये प्रथमच भारतीय गोलंदाजाने पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा कारनामा झाला होका.
चहलने आतापर्यंत खेळलेल्या 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 बळी घेतले आहेत. त्याने 42 धावांत 6 गडी बाद करत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर त्याने 75 टी-20 सामन्यांत 91 विकेट्स घेतल्या आहेत, त्यामध्ये त्याची उत्तम कामगिरी 25 धावा देत 6 विकेट्स घेतले होते. याशिवाय त्याची आयपीएल कारकीर्दही दमदार आहे. त्याने 145 सामन्यात 187 बळी घेतले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
इमर्जिंग एशिया कप फायनल: ताहिरच्या शतकाने पाकिस्तानचा धावांचा डोंगर, इंडिया ए समोर 353 धावांचे लक्ष्य
ऍडेन मार्करम लग्नबंधनात! पत्नी करते वाईन टेस्टिंग, ‘एवढ्या’ वर्षांपासून दोघजण रिलेशनमध्ये