चेन्नई : कुश इंगोले व यज्ञेश वानखेडे यांनी मिळविलेल्या रिदमिक योगासनातील कांस्यपदकाद्वारे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदकाची बोहनी झाली. दुपारच्या सत्रात महाराष्ट्राच्या स्वरा गुजर व युगांका राजम यांनी रीदमिक पेयर्स या क्रीडा प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.
कुश व यज्ञेश या अकरा वर्षाच्या खेळाडूंनी येथील स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता तरी देखील त्यांनी कोणतेही दडपण न घेता अतिशय सुरेख रचना सादर केल्या आणि कांस्यपदकाला गवसणी घातली. हे दोन्ही खेळाडू नागपूर येथे संदेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यांनी याआधी कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही कांस्यपदक पटकाविले होते. तसेच त्यांनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेतही या क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती.
पदक मिळवण्याची खात्री होती असे सांगत कुश आणि यज्ञेश म्हणाले,” आता कुठे आमच्या करिअरची सुरुवात झाली आहे आम्हाला अजूनही भरपूर यश मिळवायचे आहे. त्यामुळेच येथील कांस्य पदक आमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. आता आम्ही अधिक जोमाने सराव करणार आहोत.
दुपारच्या सत्रामध्ये स्वरा गुजर व युगांका राजम यांनी रीदमिक पेयर्समध्ये अप्रतिम कौशल्य दाखवीत रौप्य पदक जिंकले. या दोन्ही खेळाडू अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडू असून त्यांना या शाळेचे चेअरमन संजय मालपाणी तसेच प्रशिक्षक विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व किरण वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
रौप्य पदक जिंकल्यामुळे आम्ही खूप भारावून गेलो आहोत असे सांगून स्वरा व युगांका म्हणाल्या की,” आम्हाला अजून भरपूर यश मिळवायचे आहे. त्यासाठी आजचे पदक हे पायाच आहे. कनिष्ठ व वरिष्ठ या दोन्ही गटात आम्हाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करायची असून त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेणार आहोत.”
येथील स्पर्धेत महाराष्ट्राचे अकरा मुले व नऊ मुली असे एकूण वीस खेळाडू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला गतवेळी देखील खेलो इंडिया व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत योगासनामध्ये भरपूर पदके मिळाली होती.
चौकट : आर्टिस्टिक योगासनामध्ये सुवर्णपदकाची आशा
योगासन स्पर्धेमध्ये उद्या म्हणजे रविवारी आर्टिस्टिक योगासनाच्या उपांत्य फेरीच्या स्पर्धा होणार आहेत. मुलींच्या उपांत्य फेरीचा स्पर्धा दुपारी तीन वाजता सुरू होणार असून त्यामध्ये चांगले यश मिळवित स्वरा गुजर व युगांका राजम या दोन्ही खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील अशी आशा आहे. सकाळच्या सत्रात मुलांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये प्रीत बोरकर व निबोध पाटील हे दोन्ही खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील अशी अपेक्षा आहे. (Bohni of Maharashtra medal by bronze medal in Rhythmic Yogasana; Silver performance in girls)
महत्वाच्या बातम्या –
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा । रिदमिक योगासनातील ‘कांस्य’ पदकाद्वारे महाराष्ट्राच्या पदकाची बोहनी
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा । मिड लाईन स्पोर्टस, श्रीराम कबड्डी संघ, ओम पिंपळेश्वर, गोलफादेवी बाद फेरीत दाखल