क्रिकेटच्या मैदानावर असे क्षण बऱ्याचदा दिसतात, जे खूप विचित्र असतात. काही गोष्टी पाहून बऱ्याचदा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले. रायगड रॉयल्स आणि पुणेरी बाप्पा यांच्यात खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात एक खेळाडू विचित्र पद्धतीने धावबाद झाला. यष्टीरक्षक सूरज शिंदेने स्ट्रायकरच्या टोकावर सिद्धेश वीरला बाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चुकून नॉन-स्ट्रायकरच्या टोकाचा स्टंप उखडला गेला. त्यामुळे हर्ष मोगवीराला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रायगड रॉयल्स संघाचा सलामीवीर असलेल्या सिद्धेशने रामकृष्ण घोषने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर लेग साईडवर फटका खेळून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पुणेरी बाप्पाचा यष्टीरक्षक असलेल्या सुरज शिंदे याने चपळता दाखवली आणि चेंडू उचलत आणि स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. हा चेंडू स्टंपवर आदळला. मात्र, सिद्धेश चेंडू लागण्याआधीच क्रीजमध्ये परतला होता. असे असतानाही, चेंडू स्ट्रायकरच्या बाजूच्या स्टंपवर लागल्यानंतरही वेगाने नॉन-स्ट्रायकरच्या बाजूला गेला. खालच्या बाजूला उभा असलेला फलंदाज हर्ष मोगवीराने क्रीजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत चेंडू नॉन-स्ट्रायकरच्या बाजूच्या स्टम्प्सला येऊन लागला आणि स्टंप उखडले गेले. अशाप्रकारे हर्ष खाते न खोलताच माघारी परतला.
अशा प्रकारची घटना क्रिकेटजगतात दुर्मिळच घडते. नजीकच्या काळात 2023 मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळाडू अशा पद्धतीने बाद झालेला. विशेष म्हणजे हा खेळाडू वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू आंद्रे रसेल हा होता.
विजयासाठी 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रायगड रॉयल्सची सुरुवात खराब झाली, ज्याची त्यांना किंमत मोजावी लागली. पुणेरी बाप्पाने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रायगड संघ 13.1 षटकांत सर्वबाद झाला. कर्णधार ऋषभ राठोडने सर्वाधिक 46 धावा केल्या. रायगड रॉयल्सचे आठ खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पुण्याचा वेगवान गोलंदाज निकित धुमाळने डावाची सुरुवात केली. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 39 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, पुणेरी बाप्पाने चार गडी गमावत 202 धावा केल्या होत्या. यश नाहरने 82 तर ऋषिकेश सोनवणेने 58 धावा केल्लेया. तर सुरज शिंदेने 12 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा तडकावलेल्या.






