आज (27 फेब्रुवारी) मेलबर्न येथे भारतीय महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात (Indian Women’s Team vs New Zealand Women’s Team ) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) सामना पार पडला. या सामन्यात 3 धावांनी विजय मिळवत भारताने विजयी हॅट्रिक पूर्ण केली आहे. तसेच, उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली आहे.
या सामन्यात भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) उत्कृष्ट खेळी करत महिला टी20 विश्वचषकात सर्वात वेगवान धावा करण्याचा विक्रम केला आहे. तिने महिला टी20त 147.97च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत 438 धावा केल्या आहेत.
महिला टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कोणत्याही फलंदाजाने इतक्या वेगवान गतीने 400हून अधिक धावा करण्याचा विक्रम केलेला नाही. मात्र, शेफालीने हा विक्रम करत दक्षिण आफ्रिकाची अष्टपैलू क्रिकेटपटू क्लो ट्रिऑन (Chloe Tryon) आणि ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीला (Alyssa Healy) मागे टाकले आहे.
ऑस्टेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शेफालीने 15 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. यात 1 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. तर, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिने 17 चेंडूत 39 धावा केल्या होत्या. यात 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
शिवाय, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शेफालीने 34 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. याप्रकारे तिने टी20 विश्वचषकातील 3 सामन्यात 66 चेंडूत 114 धावा केल्या आहेत.
शनिवारी (29 फेब्रुवारी) मेलबर्न येथे श्रीलंका महिला संघाविरुद्ध भारतीय महिला संघाचा पुढील सामना होणार आहे.
महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टाईक रेट असणाऱ्या महिला फलंदाज
147.97 स्ट्राईक रेट- शेफाली वर्मा (438 धावा)
138.31 स्ट्राईक रेट- क्लो ट्रिऑन (722 धावा)
129.66 स्टाईक रेट- एलिसा हेली (1875 धावा)






