कसोटी क्रिकेटनंतरचा दुसरा क्रिकेट प्रकार ज्याला आपण वनडे क्रिकेट म्हणून ओळखतो. वनडे क्रिकेटचा पहिला सामना खेळला गेला तो ५ जानेवारी १९७१. वनडे क्रिकेटच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक फलंदाजांनी मोठ- मोठ्या खेळी केल्या आहेत. वनडे सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर आहे. हा विक्रम त्याने प्रथम फलंदाजी करताना केला होता.
परंतु वनडे सामन्यात जेव्हा धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याच्या विक्रमाची चर्चा होते, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एका माजी फलंदाजाचे नाव घेतले जाते. असे असले तरीही वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहलीनेही मोठ्या वैयक्तिक खेळी केल्या आहेत.
धोनीला जगातील सर्वात मोठा फिनिशर मानले जाते आणि म्हटले जाते की तो धावांचा पाठलाग करण्यात माहीर आहे. त्याचबरोबर विराटला धावांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत मास्टर म्हटले जाते. परंतु यामध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे, तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉटसनने (Shane Watson).
वॉटसनने वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वैयक्तिक धावांची खेळी केली होता. त्याने नाबाद १८५ धावा केल्या होत्या. याबाबतीत तो जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.
वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करणारे जगातील २ दिग्गज फलंदाज धोनी आणि विराटने प्रत्येकी १८३ धावांची खेळी केली आहे. धोनी (MS Dhoni) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉटसननंतर तो या क्रमांकावर असण्याचे कारण म्हणजे त्याने नाबाद खेळी केली होती. तर विराट (Virat Kohli) ही खेळी करताना बाद झाला होता. अशाप्रकारे तो वनडेत धावांचा पाठलाग सर्वाधिक धावा करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज आहे.
या यादीत चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) आहे. त्याने वनडेत धावांचा पाठलाग करताना नाबाद १८१ धावांची खेळी केली होती, तर या यादीत न्यूझीलंडचाच फलंदाज मार्टिन गप्टील (Martin Guptill) पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने वनडेत धावांचा पाठलाग करताना नाबाद १८० धावांची खेळी केली होती.
वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांची खेळी करणारे जगातील ५ अव्वल फलंदाज
१८५*- शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
१८३*- एमएस धोनी (भारत)
१८३- विराट कोहली (भारत)
१८१*- रॉस टेलर (न्यूझीलंड)
१८०*- मार्टिन गप्टील (न्यूझीलंड)