दोन दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेटपटूंना २०२० टी२० विश्वचषकात मिळालेली बक्षिस रक्कम बीसीसीआयने दिली नसल्याची बातमी पुढे आली होती. आता यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएल व आयपीएलचे संचालन करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने १० वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये खेळलेल्या सामन्यांची रक्कम न दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे आयपीएल व बीसीसीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या खेळाडूने लावला आरोप
आयपीएलच्या चौथ्या हंगामात कोची टस्कर्स केरलासाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ब्रॅड हॉज याने बीसीसीआयने कोचीसाठी खेळणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेपैकी ३५ % रक्कम अजूनही मिळाले नसल्याचे म्हटले. हॉजने ट्विट करताना लिहिले,
‘दहा वर्षांपूर्वी कोची टस्कर्स केरलासाठी खेळलेले खेळाडू अजूनही आपल्या मानधनापैकी ३५% रक्कम मिळण्याची वाट पाहत आहेत. बीसीसीआयला याबद्दल काही माहित आहे का?’
हॉजने हे ट्विट महिला खेळाडूंना न मिळालेल्या मानधनाच्या बातमीला रिप्लाय देताना लिहिले आहे.
Players are still owed 35% of their money earned from ten years ago from the @IPL representing Kochi tuskers. Any chance @BCCI could locate that money?
— Brad Hodge (@bradhodge007) May 24, 2021
कोचीचा संघ निलंबित
आयपीएलच्या चौथ्या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया व कोची टस्कर्स केरला हे दोन संघ सामील करण्यात आले होते. मात्र, भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियानंतर कोची संघाला आयपीएलमधून बाहेर केले गेले. त्या हंगामात या संघाचे नेतृत्व श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने याने केले होते. या संघात हॉजसह श्रीसंत, पार्थिव पटेल, ब्रेंडन मॅक्युलम यांच्यासारखे दिग्गज खेळाडू सामील होते.
हॉजने केले आयपीएलमध्ये तीन संघांचे प्रतिनिधित्व
एकावेळी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असलेल्या ब्रॅड हॉजने आयपीएलचे सात हंगाम खेळले. यामध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स, कोची टस्कर्स केरला व राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. हॉजने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ६६ सामने खेळताना १४०० धावा व १७ बळी मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ख्रिस गेलच्या अतरंगी फोटोवर डेव्हिड वॉर्नरने घेतली फिरकी; केली ‘अशी’ विनोदी कमेंट
विराट-अनुष्काची पुन्हा अभिमानास्पद कामगिरी, दुर्मिळ आजार असलेल्या अयांशला केली ‘ही’ मदत