ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रदीर्घ दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात एक आठवड्यापूर्वीच दाखल झाला आहे. भारतीय संघ सिडनी येथे सराव करताना दिसून आला. भारताचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही. दुखापतीमुळे रोहित सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. रोहित मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकणार असला, तरी कसोटी मालिकेत खेळताना दिसेल. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने रोहितविषयी वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे रोहितच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरलेली दिसून आली.
रोहितने कसोटीत नेतृत्व करावे
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना खेळून भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाची नेतृत्व करावी, असे अनेक दिग्गजांचे मत आहे.
हॉगचे रोहितविषयी वादग्रस्त वक्तव्य
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने मात्र रोहितच्या कसोटी संघातील जागेविषयीच खळबळजनक वक्तव्य केले आहे. हॉगला ट्विटरवरील एका चाहत्याने, “अजिंक्य रहाणेला अखेरच्या तीन कसोटी सामन्यात कर्णधार करावे का?” असा प्रश्न विचारला असता त्याला उत्तर देताना हॉग म्हणाला, “रहाणेच भारतीय संघाचा कर्णधार असावा. तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. कर्णधारपदाचा दुसरा पर्याय रोहित शर्मा आहे. मात्र, त्याची विदेशी खेळपट्ट्यांवरील कामगिरी पाहिली, तर त्याची अंतिम अकरामध्ये देखील जागा बनत नाही.”
रोहितची विदेशात निराशाजनक आकडेवारी
रोहितच्या चाहत्यांना हॉगचे हे वक्तव्य आवडले नाही. मात्र, आकड्यांनुसार हॉगच्या मतात तथ्य आहे. रोहित ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत फक्त ३१ च्या सरासरीने धावा काढू शकला आहे. इंग्लंडमध्ये तो दोन कसोटीत अवघ्या ३४ धावा काढू शकला होता. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्येही रोहितची सरासरी अत्यंत निराशाजनक आहे.
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार असलेला रोहित आयपीएलवेळी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याचा समावेश ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोणत्याही संघात करण्यात आला नव्हता. रोहितची निवड न झाल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचा समावेश कसोटी संघात करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचे माजी दिग्गजाला चोख प्रत्युत्तर; म्हणाला…
“मी निराशेतून लवकर बाहेर येईल आणि…”, भारतीय संघात निवड न झाल्यामुळे सूर्यकुमारने रोहितशी केली चर्चा
…म्हणून मुंबईच्या प्रशिक्षकाला नकोय ‘मेगा ऑक्शन’