---Advertisement---

टेलरला मिळाला नाही विजयी निरोप, आयर्लंडने तिसऱ्या वनडेत झिम्बाब्वेला केलं पराभूत

On: मंगळवार, सप्टेंबर 14, 2021 2:40 PM
---Advertisement---

सोमवारी (१३ सप्टेंबर) आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. झिम्बाब्वेच्या या पराभवामुळे दिग्गज क्रिकेटपटू ब्रेंडन टेलरला विजयी निरोप मिळाला नाही.

तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वीच ब्रेंटन टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सोमवारचा सामना त्याच्यासाठी अखेरचा सामना होता.

या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली.

आयर्लंडने जिंकला सामना
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. हा निर्णय योग्य ठरला. कारण झिम्बाब्वेचा संघ ३४ षटकातच १३१ धावांवर गुंडाळण्यात आयर्लंडला यश आले. झिम्बाब्वेला पहिला धक्का टेलरच्या रुपातच मिळाला होता. तो केवळ ७ धावा करुन माघारी परतला होता.

झिम्बाब्वेकडून कर्णधार क्रेग अर्विनने अर्धशतकी खेळी करत ६५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. झिम्बाब्वेचे ७ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. आयर्लंडकडून जोशुआ लिटिल आणि अँडी मॅकब्रायनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच सिमी सिंगने २ आणि शेन गेटकेटने १ विकेट घेतली.

प्रतिउत्तरादाखल आयर्लंड संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरण्यासाठी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्यासमोर डकवर्थ लूईस नियमानुसार ३२ षटकात ११८ धावांचे लक्ष ठेवण्यात आले. हे लक्ष्य आयर्लंडने २२.२ षटकांतच ३ विकेट्सहच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक ४० चेंडूत ४३ धावा केल्या. तसेच कर्णधार अँड्र्यू बलबर्नीने ४३ चेंडूत ३४ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड एनगवरा आणि वेलिंग्टन मसाकादझा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

आयर्लंडच्या अँडी मॅकब्रायनला सामनावीर पुरस्कार मिळाला तर विलियम्स पॉर्टरफिल्ड मालिकावीर ठरला.

ब्रेंडन टेलरने घेतली निवृत्ती
ब्रेंडन टेलरने अखेरचा वनडे सामना खेळण्यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने निवृत्ती घेताना म्हटले होते की ‘जड अंतकरणाने घोषणा करत आहे की उद्या होणारा सामना माझा माझ्या प्रिय देशासाठी अखेरचा सामना असेल. १७ वर्षांत चढ आणि उतार आले आणि ते मी जगासाठी बदलणार नाही. त्यांनी मला प्रामाणिक राहायला शिकवले. त्यांनी मला नेहमी आठवण करुन दिली की मी इतका काळ ज्या स्थानी होतो, त्या स्थानी असणे किती भाग्यवान आहे.’

https://twitter.com/BrendanTaylor86/status/1437132403760320521

याबरोबरच त्याने सर्वांचे आभार मानले होते. २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या टेलरने झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं केली असून तो सर्वाधिक धावा करण्याबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

३५ वर्षीय ब्रेंडनने आतापर्यंत ३४ कसोटी सामने, २०५ वनडे सामने आणि ४४ टी२० सामन्यांमध्ये झिम्बाब्वे संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने अनुक्रमे कसोटीत २३२०, वनडेत ६६८४ आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९३४ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच त्याच्यानावावर कसोटीत ६ आणि वनडेत ११ शतके आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये ठोकू शकतो ४० चेंडूत शतक, गौतम गंभीरचा विश्वास

Video: ‘मिस्टर ३६०’चा नेटमध्येही दिसला आक्रमक अंदाज, नेटमध्ये डिव्हिलियर्सने मारले हवाई फटके

विराटशी कोणतीही गोष्ट बोलताना डिव्हिलियर्सला वाटते भीती, कारण जाणून व्हाल चकीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---