इंग्लंड क्रिकेट संघाला मर्यादित षटकांच्या संघासाठी नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. अलीकडच्या काळात वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाची कामगिरी काही विशेष राहिली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. इंग्लंडच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांना आता वनडे व टी20 संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) याची घोषणा केली. मॅक्युलमने मॅथ्यू मॉट यांची जागा घेतली.
ब्रेंडन मॅक्युलम 2022 पासून इंग्लंडच्या कसोटी संघाशी जोडला गेला आहे. आता त्याने आपला करार 2027 पर्यंत वाढवला असून, 2025 च्या सुरुवातीपासून तो इंग्लंडच्या तिन्ही संघांची जबाबदारी सांभाळेल. त्याचवेळी, मार्कस ट्रेस्कोथिक हे या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी आणि कॅरेबियन दौऱ्यासाठी अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
इंग्लंड क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की म्हणाले, “ब्रेंडनने आता इंग्लंडच्या तिन्ही संघांची जबाबदारी स्वीकारली याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, इंग्लिश क्रिकेटला आणखी उन्नत करण्यासाठी त्याच्या गुणवत्तेचा प्रशिक्षक मिळाल्याने आम्ही भाग्यवान आहोत. आता सर्व संघांना एकत्र आणण्यात तो यशस्वी होईल याची खात्री आहे. तसेच, भविष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.”
इंग्लंड क्रिकेट संघाची कामगिरी 2022 नंतर मर्यादित षटकांमध्ये खराब राहिली आहे. त्यांना 2023 वनडे विश्वचषकाच्या साखळी फेरीतच बाद व्हावे लागले होते. तसेच, टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत त्यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंग्लंडच्या वनडे व टी20 संघांची घोषणा झाली असून, अनेक अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान मिळाले नाही. यामध्ये प्रामुख्याने मोईन अली, जॉनी बेअरस्टो व जो रूट यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराची भारताला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती