लखनऊ सुपर जायंट्सनं वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या दुखापतीचं योग्य व्यवस्थापन केलं नसल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानं व्यक्त केलं आहे. पोटातील दुखण्यानंतर या युवा वेगवान गोलंदाजाला वेळेआधीच मैदानावर उतरवण्यात आलं असल्याचं ब्रेट ली म्हणाला.
21 वर्षीय मयंकला 7 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान पोटात दुखापत जाणवली होती. हा त्याचा आयपीएलमधील तिसरा सामना होता. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये त्यानं आपल्या गतीनं सर्वांना प्रभावित केलं होतं जेथे तो दोन्ही सामन्यांमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता.
मंगळवारी (30 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मयंकनं पुनरागमन केलं. परंतु पोटातील दुखणं पुन्हा उफाळून आल्यानं तो चौथं षटक पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला. लखनऊचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितलं की, मयंक यादवला त्याच ठिकाणी वेदना जाणवत होत्या, ज्यामुळे तो जवळपास तीन आठवडे मैदानाबाहेर होता. क्रिकेटच्या महान गोलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या ब्रेट ली यानं यासाठी लखनऊ संघाचं व्यवस्थापन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे.
ब्रेट ली म्हणाला, “साइड स्ट्रेन किंवा तशाप्रकारच्या दुखापतीतून बरं होण्यासाठी साधारणपणे किमान चार ते सहा आठवडे लागतात. आम्हाला माहित नाही की दुखापत किती गंभीर आहे. परंतु जो 150 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी करतोय, त्याच्यासाठी हे चांगलं व्यवस्थापन नाही. याची जबाबदारी लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे.”
1999 ते 2008 दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून 76 कसोटी सामन्यांमध्ये 310 विकेट्स घेणाऱ्या 47 वर्षीय लीनं मयंकबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. त्याला योग्य सल्ला मिळायला हवा होता, असं तो म्हणाला. ब्रेट ली म्हणाला की, “याची किंमत मयंकला मोजावी लागू शकते. आयपीएलमध्ये प्रत्येकाला त्याची क्षमता काय आहे हे पाहायला आवडेल. त्याला योग्य सल्ला मिळाला असता तर त्याला यातून जावं लागलं नसतं.”
महत्त्वाच्या बातम्या –
दुखापतग्रस्त मयंक यादवला जसप्रीत बुमराहकडून मिळाल्या खास टिप्स! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल