आयपीएल 2021 ही स्पर्धा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी फारच निराशाजनक ठरली आहे. संघाला सातत्याने पराभवाचे तोंड पाहावे लागत असल्यामुळे संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेत, नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नर याचा कर्णधारपदावरुन पायउतार केला आहे. वॉर्नरच्या जागी संघाचे नेतृत्व केन विलियम्सन करणार आहे. वॉर्नरचे कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर त्याला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली नाही. सनरायझर्स हैदराबादच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट लीने आश्चर्यचकित होत प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार स्पोर्ट्समधील कार्यक्रमादरम्यान ली म्हणाला, “मी खरंच आश्चर्यचकित झालो आहे की राजस्थान विरुद्धच्या सामन्यात वॉर्नरला अंतिम 11 मध्ये संधी का मिळाली नाही? मला हे माहित आहे की या हंगामात वॉर्नर चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत नव्हता. पण त्याने कायमच आयपीएलमध्ये धावा बनवल्या असून ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये तो सातत्याने सहभागी असतो.”
जुना व्हिडिओ शेअर करत काढली होती चाहत्यांची आठवण
विशेष म्हणजे वॉर्नरचे कर्णधारपद काढून घेण्याचा हा मोठा निर्णय माध्यमांमध्ये येण्यापूर्वी वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक जुना व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्रिकेट स्टेडियम वॉर्नर, वॉर्नर हा नारा देत होते. वॉर्नरने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ 2019 आयपीएल हंगामातील होता. त्यावेळी वॉर्नरने बॉल टेंपरिगमधील 1 वर्षाचे निलंबन स्विकारून आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते.
या सामन्यात वॉर्नरने रॉयल चॅलेंजेस बेंगलोर संघाविरुद्ध शानदार शतकीय खेळी केल्यानंतर हैदराबादमधील संपूर्ण स्टेडियम त्याचा नावाचा जयजयकार करत होते. वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर करत आपण आपल्या चाहत्यांना फार मिस करत असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याचे कर्णधारपद काढून घेणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे अनेक जण अंदाज बांधत आहेत की, वॉर्नरने भावनिक होवून हा व्हिडिओ शेअर केला होता.
आयपीएलमधील कामगिरी राहिलीय उल्लेखनीय
वॉर्नरच्या कामगिरीचा विचार केला असता, तो खऱ्या अर्थाने हैदराबाद संघाचा एक आधारस्तंभ म्हणून गणला जातो. 2014 पासून हैदराबादच्या संघाचा नियमित सदस्य असलेल्या वॉर्नरने आपल्या नेतृत्वात 2016 साली हैदराबाद संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. वॉर्नर हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक सातत्य राखणाऱ्या खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याने 2015, 2017 व 2019 या तीन वर्षात ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा) पुरस्कार जिंकलेला आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी हैदराबाद संघ त्याला आपल्या संघात ठेवतो अथवा तो लिलाव प्रक्रियेत सहभागी होतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आवड, स्टाईल की अजून काही; एकवेळ डोक्यावर भरगच्च केस असलेला गब्बर आता का ठेवतो टक्कल? वाचा
आयपीएलला कोरोनाच दणका! दिल्ली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफचे ‘इतके’ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे वाईट बातमी, राजस्थानच्या ‘या’ खेळाडूचे आयपीएलमध्ये खेळणे कठीण