जागतिक बॅडमिंटन असोशिएशनने नव्यानेच घोषित केलेल्या क्रमवारीत किदांबी श्रीकांत दुसऱ्या स्थानी आला आहे. फ्रेंच ओपन सुपरसिरीजनंतर आज ही क्रमवारी घोषित करण्यात आली.
श्रीकांतची कारकिर्दीतील ही सर्वोच्च क्रमवारी असून यापूर्वी तो ऑगस्ट २०१५मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. दोन आठवड्याच्या काळात श्रीकांत ८व्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे.
पॅरिस शहरात सुपर सिरीज जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान श्रीकांतला मिळाला आहे. ही स्पर्धा यापूर्वी सुपरसिरीज प्रकारातील नव्हती.
या खेळाडूने यावर्षी फ्रेंच ओपन सुपरसिरीज, इंडोनेशिया ओपन (जून), ऑस्ट्रेलिया ओपन (जून) आणि डेन्मार्क ओपन (ऑक्टोबर) या ४ सुपर सिरीज स्पर्धा जिंकल्या आहेत.
एका वर्षात २वेळा सलग दोन सुपरसिरीज स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा ली चॉन्ग (२०१२) नंतर केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये एचएस प्रणॉय कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात ११व्या स्थानी आला आहे तर अजय जयराम २२व्या स्थानावर आहे. समीर वर्मा १८व्या तर सौरभ वर्मा ४१व्या स्थानावर आहेत. पी कश्यप ४५व्या स्थानी कायम आहे.
पीव्ही सिंधू आणि साईना नेहवाल यांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. साईना नेहवाल ११व्य स्थानी कायम असून पीव्ही सिंधू आपले दुसरे स्थान राखून आहे.