एकीकडे टी२० विश्वचषकात खराब कामगिरी केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघावर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. त्याचवेळी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील नव्या वादात अडकले आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव आदित्य वर्मा यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि इतर पदाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या कारणाने पाठवली गेली नोटीस
पटणा उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अभिनव श्रीवास्तव यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसनुसार, बीसीसीआयच्या सुधारित घटनेने राज्य क्रिकेट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी सहा किंवा तीन वर्षांसाठी अनिवार्य केला आहे. त्यानंतर तीन वर्षांचा कूलिंग कालावधी असेल. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वांनी मान्य करणे आवश्यक आहे. त्यानुसार, २३ ऑक्टोबर २०१९ रोजी बीसीसीआयची निवडणूक झाली आणि सौरव गांगुली अध्यक्ष, जय शाह सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाली.
या नोटीसीमध्ये सौरव गांगुली यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे की, ते सचिव असताना २७ जुलै २०१४ रोजी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्षही झाले होते. यानंतर ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. त्यांचा कूलिंग पीरियड २७ जुलै २०२० रोजी समाप्त झाला आहे. असे असताना गांगुली दररोज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत, आजपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बोर्डाच्या इतर अधिकाऱ्यांसह सौरव यांचे उत्तर १५ दिवसांत न मिळाल्यास वर्मा व असोसिएशन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी याचिका दाखल करेल.
भारतीय संघाचे राहिले माजी कर्णधार
सौरव गांगुली हे भारतीय संघाचे माजी कर्णधार राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एका नव्या उंचीला स्पर्श केलेला. गांगुलींच्या नेतृत्वाखाली भारत परदेशी भूमीवर जिंकायला शिकला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ २००३ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु, भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. क्रिकेट सोडल्यानंतर गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सचिव झाले आणि त्यानंतर त्यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’
आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर