आयपीएलमधील सर्वात मोठी रायवलरी कोणती? असा प्रश्न विचारल्यावर जो थोडाफार तरी क्रिकेट फॉलो करतो; तो व्यक्ती क्षणार्धात उत्तर देईल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स. या दोन्ही टीमचे फॅन एकमेकांना अक्षरशः पाण्यात पाहत असतात. आपली विरोधी टीम हरली की स्टेटस वॉर सुरू होतं. मात्र, २०२२ आयपीएलमध्ये फार असं काही घडलच नाही. कारण, दोन्ही टीम्स एकाच नावेतून गेल्या. आधी मुंबई आणि नंतर चेन्नई प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडली. चेन्नईची स्थिती जरा बरी राहिली. कारण, ते बॉटम ऑफ द टेबल नाही राहिले, पण मुंबईवर ती नामुष्की आली. पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारी मुंबई तिथे पाहून विरोधकांनाही वाईट वाटलं, पण मुंबईचा असा डाऊन फॉल कसा काय झाला? त्यांचं काय चुकलं? आणि यातून सावरत पुढच्या वर्षी जबरदस्त कमबॅक करण्यासाठी ते काय करतील याचा आढावा घेणारा हा लेख.
काही क्रिकेट समीक्षक म्हणतात ना, आयपीएलनंतर मैदानावर खेळली जाते, ती आधी ऑक्शन टेबलवर खेळावी लागते, आणि मुंबई या खेळात तरबेज आहे. दिग्गज कोचिंग स्टाफ, वर्ल्ड क्लास स्काऊट्स, ऍनालिस्टस असताना मुंबई ऑक्शनमध्ये धमाका करते. मात्र, यावर्षी ऑक्शनआधी एक छोटस बुद्धी युद्ध त्यांना खेळायचं होतं. ते होत रिटेंशनच. मेगा ऑक्शन होणार असल्याने प्रत्येक टीमला चार प्लेयर रिटेन करायची संधी होती. मुंबईची दोन नाव फिक्स होती एक कॅप्टन रोहित शर्मा आणि दुसर जसप्रीत बुमराह. तिसरं नाव हार्दिक पंड्याच असेल असं वाटत होतं. मात्र, त्याला नव्या अहमदाबाद फ्रॅंचाईजीने १६ कोटी आणि कॅप्टन्सी ऑफर केल्यावर तो तिकडे गेला. त्याच्या जागी रिटेन झाला सूर्यकुमार यादव. आता एक जागा शिल्लक होती फॉरेन प्लेअरची. उमेदवार तीन. मुंबईची सर्वात जास्त सेवा केलेला कायरन पोलार्ड, तुफानी ओपनर क्विंटन डी कॉक आणि बुमराहच्या जोडीने बॉलींग अटॅक धारदार बनवणारा ट्रेंट बोल्ट. मॅनेजमेंटने थोडा भावनिक निर्णय घेतला आणि पोलार्डला रिटेन केले. चार बडे प्लेअर रिटेन केल्याने मुंबईकडे ऑक्शनमध्ये जाताना सर्वात कमी रक्कम शिल्लक होती.
जेव्हा ऑक्शन सुरू झाले, तेव्हा तर मुंबईकडे काही प्लॅन नसल्यासारखे वाटले. ज्या डी कॉक आणि बोल्टला खरंतर रिटेन करायला हवं होतं, त्यांना मुंबईने फक्त औपचारिक बोली लावून सोडून दिले. पहिल्या दीड तासात बाकी टीमने प्रमुख चार चार प्लेयर विकत घेतले तरी, मुंबईच्या खात्यात एकही प्लेअर नव्हता. अखेर १५.२५ कोटींना इशान किशनला कायम करण्यात त्यांना यश आले. मात्र, पुढचे गणित गंडले जाऊ लागले. पहिल्या दिवशी इशान सोडून कोणीही महत्त्वाचा प्लेयर त्यांना घेता आला नाही. दुसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस ही चर्चेतील नावे मुंबईकर झाली. मात्र, बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये बुमराह सोडून कोणी दिसतच नव्हतं. शेवटी मुंबईने एक अनपेक्षित निर्णय घेतला. जो जोफ्रा आर्चर यावर्षी खेळणारच नव्हता, त्या आर्चरवर त्यांनी ८ कोटींची बोली लावली. सॅम्स, मेरेडिथ, मिल्स, उनादकत, एम अश्विन यांना घेऊन थोडाफार बरा बॉलींग अटॅक त्यांनी शेवटी बनवला.
हेही पाहा- Mumbai Indians टीममध्ये IPL 2023मध्ये होऊ शकतात हे मोठे बदल
ज्यावेळी टूर्नामेंट सुरू झाली तेव्हा मात्र मुंबईच्या मर्यादा उघड्या पडत गेल्या. ऑन पेपर वाटलेली तशीच मुंबईची टीम खेळू लागली. सूर्यकुमार यादव पहिल्या तीन मॅचला उपलब्ध नव्हता. कॅप्टन रोहित, इशान किशन, पोलार्ड यांचा फॉर्म पूर्ण गंडला. बुमराहला टीम्स जपून खेळत आणि बाकीच्यांवर आक्रमण करत. पहिल्या आठ मॅच झाल्या तरी विजय त्यांच्यापासून दूरच होता. अखेर राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांना यश आले. मात्र, आता उशीर झालेला. ते प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर गेलेले. मुंबईने नव्या प्लेअर्सला चान्स दिला. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय यांनी पुढच्या सिझनसाठी आशा जागवल्या. मुंबईसाठी एका निराशाजनक सीजनची अखेर पॉइंट टेबलच्या शेवटी झाली.
मुंबई पुढच्या सीझनला स्ट्रॉंग कमबॅक करेल यात शंकाच नाही. कारण, आयपीएल ट्रॉफी जिंकायला हवी तशी टीम त्यांच्याकडे आहे. यावर्षी फ्लॉप झालेले रोहित-इशान टचमध्ये आल्यावर, आणि आहे त्या टीममध्ये आर्चरची एन्ट्री झाल्यावर तसेच एक क्वालिटी स्पिनर पलटणमध्ये दाखल झाल्यास मुंबई पुन्हा एकदा ‘दुनिया हिला देंगे’ हा आपला नारा नक्कीच बुलंद करेल. बाकी टेक्निकल गोष्टी बघायला सचिन, जयवर्धने, झहीर आहेतच की, आणि सहावी ट्रॉफी घरी न्यायला अंबानी फॅमिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पर्पल कॅप जिंकणाऱ्या पठ्ठ्याला त्यादिवशी खाली बसवलं गेलं, नाहीतर दिल्ली आयपीएल चॅम्पियन बनली असती
कोणी संधी देता का संधी! ‘या’ ५ खेळाडूंना आयपीएल २०२२मध्ये बसावे लागले बाकावरच
पुढच्या आयपीएलमध्ये सीएसके काय बदल करणार? खूपच मोठीये यादी
एवढं कौतुक झालेल्या राजवर्धनला चेन्नईने बसूनच ठेवलं, का नाही मिळाली संधी?