१५ ऑगस्ट रोजी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप द्यायचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाकडून मागील जवळपास १५ वर्षे खेळताना धोनीने केवळ चांगला यष्टीरक्षक कर्णधार म्हणूनच नाही तर एक उत्तम कर्णधार म्हणूनही सर्वांवर स्वत:ची छाप सोडली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने ३३२ सामन्यात नेतृत्व केले आहे. या दरम्यान त्याने असे निर्णय घेतले, ज्याचा भारतीय क्रिकेटला खूप फायदा झाला. अशाच ५ धोनीच्या निर्णयांचा लेखात आढावा घेऊ ज्याने भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलले.
२००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये जोगिंदर शर्माला दिले अखेरचे षटक
२००७ मध्ये टी-२० क्रिकेटची पहिली विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकाने आयोजित केली होती. यात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोनीला संधी मिळाली. एमएस धोनीच्या नेतृत्वात संघामध्ये पूर्णपणे युवा खेळाडूंचा भरणा होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले.
या अंतिम सामन्यात धोनीने घेतलेला एक निर्णय बराच चर्चेचा विषय बनला. संघात अनुभवी गोलंदाज असूनही, धोनीने अष्टपैलू जोगिंदर शर्माला महत्वपूर्ण असलेले अंतिम षटक दिले आणि सर्वांना चकित केले. जोगिंदर शर्माने धोनीचा का निर्णय सार्थ ठरवला आणि पहिला टी-२० विश्वचषक भारताने जिंकला. कर्णधारपदाच्या पहिल्याच मोठ्या स्पर्धेत धोनीने जोगिंदर शर्माला अंतिम षटक देऊन आपले धैर्य दाखवले.
२०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फलंदाजीमध्ये स्वत: वरच्या क्रमांकावर येऊन खेळाला
भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात २८ वर्षांनंतर २०११ मध्ये विश्वचषक जिंकून इतिहासाची पुनरावृत्ती केली. विश्वचषक जिंकण्याची २८ वर्षांची प्रतीक्षा धोनी आणि सहकारी खेळाडूंनी संपविली होती. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ६ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात सर्वात विशेष म्हणजे धोनीने एक वेगळा निर्णय घेतला तो म्हणजे ३ गडी बाद झाल्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगऐवजी स्वत: धोनी फलंदाजीस उतरला. नंतर धोनीने आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघासाठी सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने त्या सामन्याक फलंदाजी करत नाबाद ९१ धावा फाटकावल्या आणि आपला निर्णय सार्थ ठरवला.
२०११-१२ मध्ये विराट कोहलीचा खराब फॉर्म असतानाही संघात कायम ठेवले
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा एक जबरदस्त खेळाडू आहे. विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहलीने मर्यादित षटकांच्याच क्रिकेटमध्ये नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताच्या या रनमशीनने वनडे-टी२० प्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही बऱ्याच धावा केल्या आहेत.
पण २०१२ पर्यंत विराट कोहलीची कसोटी कारकीर्द तितकी प्रभावी नव्हती. तो परदेशी दौऱ्यात अपयशी ठरत होता, तरीही धोनीने विराट कोहलीला सातत्याने संधी दिली आणि आज तो विराट कसोटीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो.
२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अश्विनकडून केले अखेरचे षटक
एमएस धोनीने आपल्या कारकीर्दीत अनेक वेळा बरेच आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही धोनीने असाच धोकादायक निर्णय घेतला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील इंग्लड विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात एमएस धोनीने एक मोठा निर्णय घेतला आणि आर अश्विनला या सामन्यातील शेवटचे षटक टाकायला दिले.
अश्विनला हे षटक गोलंदाजी करण्यास देणे थोडं धोकादायक होत, पण धोनीने तो निर्णय घेतला आणि त्याचा चांगला फायदा भारताला झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने पावसामुळे २० षटकांत १२९ धावा केल्या. पण भारताने यजमान इंग्लंडला हे लक्ष गाठू दिले नाही आणि अश्विनने शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी करून केवळ ९ धावा देत इंग्लड संघाला १२४ धावांवर रोखलं.
२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माला दिली सलामीची संधी
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा मर्यादित षटकातील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. रोहित शर्मा ही आज भारतीय संघाची सर्वात मोठी गरज आहे असं म्हटलं तरी ते चुकीचे नाही. पण रोहित शर्माच्या कारकीर्दीच्या सुरूवातीलाच त्याचे करिअर संपले असते. रोहित शर्माने जेव्हा भारतीय संघात प्रवेश केला, तेव्हा तो मधल्याफळीत फलंदाजी करायचा.
तो सतत फ्लॉप होत राहिल्यामुळे धोका निर्माण झाला होता. परंतु धोनीने रोहित शर्माला पाठींबा दिला आणि त्याला सातत्याने संधी दिली. २०१३ मध्ये धोनीने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला नियमित सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली आणि त्यानंतर धोनीच्या या निर्णयाने भारतीय संघाला किती फायदा झाला ते आपण सर्व पाहतोय.