शुक्रवारी (१ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यातील शेवटच्या षटकात पंजाब किंग्स संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन याचा आयपीएल २०२१ स्पर्धेतील फ्लॉप शो सुरूच आहे. पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला अवघ्या २ चेंडूंमध्ये २ धावा करता आल्या आहेत. मोहम्मद शमीने त्याला पायचित करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. यासह तो कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळेस एकेरी धाव करत बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. ओएन मॉर्गन आयपीएल २०२१ मध्ये ९ वेळेस एकेरी धाव करत माघारी परतला आहे.
ओएन मॉर्गनच्या आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत २, ७, २९, ७, ०, ४७, ०, ७, ८, ०, २ इतक्या धावा केल्या आहेत. अशी नकोशी कामगिरी करत त्याने मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर यांचा विक्रम मोडून काढला आहे. गौतम गंभीर २०१४ मध्ये आणि रोहित शर्मा २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ८ वेळेस एकेरी धाव करत बाद झाले होते.
याव्यतिरिक्त मॉर्गन हा एका आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारा परदेशी खेळाडूही ठरला आहे. त्याच्यापूर्वी शेन वॉटसन (२०१९) सर्वाधिक ८ वेळा बाद होत या विक्रमात अव्वलस्थानी होता. परंतु मॉर्गनने त्याला मागे टाकले आहे.
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने ३४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटक अखेर ७ बाद १६५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघाकडून केएल राहूलने सर्वाधिक ६७ तर मयंक अगरवालने ४० धावांची खेळी करत हा सामना पंजाब किंग्स संघाला ५ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबच्या विजयाने दिल्लीसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडले, पाहा पाँइंटटेबलमध्ये कोणता संघ कुठल्या स्थानी
महेला जयवर्धनेने हार्दिक पांड्याचे पितळ पाडले उघडे, फिटनेसबद्दल दिली महत्त्वाची माहिती