मुंबई । कोरोना या महाभयानक विषाणूंच्या सावटातच पुन्हा क्रिकेटला सुरुवात होणार आहे. क्रिकेट सुरू होण्यापूर्वी आयसीसीने नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ विशेष विमानाने इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
ही मालिका सुरू होण्यापूर्वी वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. वेस्ट इंडीजचा क्रिकेट बोर्डाने संघाला इंग्लंड दौऱयावर पाठवण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून 22.50 कोटी रुपयांची मदत घेतली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड इंग्लिश क्रिकेट बोर्डाच्या हेड कॉलिन ग्रेव्स यांना मतदान करणार आहे, असे गंभीर आरोप लावण्यात येत आहेत .
वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट या आरोपाचे खंडन करत म्हणाले की, ” हे केवळ राजकारण आहे. आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. या एथिक्स कमिटी देखील सामील आहे. चौकशी समितीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला.”
स्केरिट म्हणाले की, “वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. कोरोना महामारीमुळे परिस्थिती अधिकच खराब होत आहे. बोर्डाकडे पैसे नाहीत. यातच ईसीबी मदतीसाठी पुढे आली आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की ईसीबीने या मदतीपोटी आमच्याकडे कोणती शर्त ठेवली आहे.”
इंग्लंड आणि वेस्टइंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना आठ जुलै रोजी होणार आहे.