सध्या दिल्ली प्रीमियर लीग (Delhi Premier League) सुरु आहे. दरम्यान सेंट्रल दिल्ली विरुद्ध जुनी दिल्ली 6 यांच्यामध्ये सामना खेळला गेला. त्यामध्ये आर्यन राणा-जोंटी सिद्धूच्या विस्फोटक खेळीमुळे सेंट्रल दिल्ली किंग्जला दिल्ली प्रीमियर लीग 2024 मध्ये पहिला विजय मिळाला. शुक्रवारी (23 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्जनं जुनी दिल्ली 6 संघाचा 109 धावांच्या फरकानं पराभव केला आणि शानदार विजयाला गवसणी घातली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल दिल्ली किंग्जनं मर्यादित 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. त्यामध्ये ध्रुव कौशिकनं 19 चेंडूत 38 धावा केल्या, तर यश धुल केवळ 9 धावाच करू शकला. हितेन दलालनं 23 धावांचं योगदान दिलं, मात्र आर्यन राणा आणि कर्णधार जॉन्टी सिद्धूनं आक्रमक खेळी खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. सामन्यानंतर जॉन्टी सिद्धूला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आर्यन राणानं 38 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी केली, त्याच्या खेळीत त्यानं 9 चौकारांसह 3 षटकार उत्तुंग षटकार ठोकले. कर्णधार जॉन्टी सिद्धूनं 22 चेंडूत 50 धावांची आक्रमक खेळी केली. 50 धावांच्या खेळीत त्यानं 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले. जुनी दिल्ली 6 संघासाठी प्रिन्स यादवनं सर्वाधिक 3 आणि मनजीतनं 2 विकेट्स त्याच्या नावावर केल्या.
218 धावांचं लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेला जुनी दिल्ली 6 संघ 108 धावांवरच गारद झाला. ते संपूर्ण 20 षटकं देखील खेळू शकले नाहीत. जुनी दिल्ली 6 संघासाठी सनत सांगवाननं 18 चेंडूत 33 धावा आणि शिवम शर्मानं 22 चेंडूत 36 धावा केल्या. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सेंट्रल दिल्ली किंग्जकडून सुमित कुमारनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर कर्णधार जॉन्टी सिद्धूनं 3 आणि मणि ग्रेवालनं 3 विकेट्स घेतल्या.
अशाप्रकारे सेंट्रल दिल्ली संघानं जुनी दिली 6 संघावर 109 धावांनी धमाकेदार विजय मिळवत दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयाची नोंद केली.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणाला मिळणार संधी रिषभ पंत की ध्रुव जुरेल?
रोहित शर्मा दुसऱ्यांदा बनणार बाबा? रितिका सजदेहच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली अशी टी20 मॅच, एकाच सामन्यात 3 सुपर ओव्हर्स, कोण जिंकलं?