आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास 5 दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेदरम्यान, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागला. आता त्याच्या दुखापतीबद्दलची अपडेट समोर आली आहे. ही अपडेट स्वतः न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी शेअर केली आहे.
तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज 14 फेब्रुवारी रोजी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी, गॅरी स्टीडने रचिन रवींद्रच्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या अष्टपैलू खेळाडूला डोकेदुखीचा त्रास होत होता. परंतु आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “चांगली बातमी अशी आहे की तो हळूहळू बरा होत आहे. आम्ही डोक्याच्या दुखापतीशी संबंधित वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करत आहोत. त्याला काही दिवसांपासून डोकेदुखी होती, जी आता थोडी कमी झाली आहे. त्याने पहिल्यांदाच नेटमध्ये चेंडू खेळला, जो एक चांगला संकेत आहे. परंतु मैदानात परतण्यासाठी त्याला अजूनही काही चाचण्या कराव्या लागतील.”
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फक्त पाच दिवस आधी तिरंगी मालिकेचा हा अंतिम सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडचा महत्त्वाचा खेळाडू रचिन रवींद्र खेळू शकणार नाही. आता जर त्याची दुखापत सुधारली नाही तर ती न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड वेळापत्रक
19 फेब्रुवारी 2025: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (नॅशनल स्टेडियम, कराची)
24 फेब्रुवारी 2025: न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
02 मार्च 2025: न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
हेही वाचा-
IPL 2025: हंगामाची सुरुवात RCB च्या सामन्याने, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट!
WPL स्पर्धेला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी कुठे पाहायचा सामना
बीसीसीआयचे नवे नियमन, खेळाडूंच्या कुटुंबीयांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘नो एन्ट्री’!