आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एक मोठी माहिती समोर येत आहे. नव्या रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावलं जाऊ शकतं. वास्तविक, आतापर्यंत पाकिस्तानच्या 3 स्टेडियमचं काम पूर्ण झालेलं नाही. या स्टेडियमचं बांधकाम अजूनही सुरू आहे. या 3 स्टेडियमचं बांधकाम ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झालं होतं. ते 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं होतं. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करता आलं नाही.
याचा फटका आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसू शकतो. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमवावं लागू शकतं. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी केवळ 35 दिवस उरले आहेत. त्याआधीच पाकिस्तानातून अपूर्ण राहिलेल्या कामाचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतल्यास संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) यजमानपदाची संधी मिळू शकते. मात्र, याआधी आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अल्टिमेटम दिला आहे. अल्टिमेटमनुसार, पीसीबीला कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण स्टेडियमची कामं 25 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी लागतील. यानंतर आयसीसीचे अधिकारी या स्टेडियमचा आढावा घेतील. मग ते आपल्या अहवालात सांगतील की, हे स्टेडियम स्पर्धेचं आयोजन करण्यास तयार आहे की नाही.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येतील. भारतीय संघ स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्ध करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतानं पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर भारतीय संघाचे सर्व सामने युएईमध्ये हलवण्यात आले आहेत. भारतीय संघ जर बाद फेरीत पोहचला, तर ते सामने देखील दुबईमध्ये खेळले जातील.
हेही वाचा –
न्यूझीलंडमध्ये घडला इतिहास! या खेळाडूने घेतली 2025 ची पहिली हॅट्ट्रिक
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतात ‘हे’ 3 यष्टीरक्षक
वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या मार्टिन गुप्टिलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा