---Advertisement---

‘चेज मास्टर’ विराट शतकी खेळी करत परतला फॉर्ममध्ये, आरसीबीने केकेआरचा 6 विकेट्सने पराभव करत गाठले अव्वल स्थान

On: गुरूवार, मे 14, 2026 9:03 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी (१३ मे) रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स भिडले. या सामन्यात आरसीबीने ५ चेंडू शिल्लक राखत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या १९३ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने १९.१ षटकांत ४ विकेट्स गमावत १९४ धावा केल्या. यामध्ये आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीने नाबाद १०५ (६०) धावा केल्या.

पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारने संघाला पहिले दोन विकेट्स मिळवून दिले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे १९ (१३) धावा आणि फिन ऍलन १८ (८) धावा करत बाद झाले. त्यानंतर अंगकृष रघुवंशीने संघाचा डाव सावरला. त्याने कॅमेरॉन ग्रीनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. रघुवंशी ७१ (४६) धावा करत धावबाद झाला. तसेच रिंकू सिंग ४९ (२९) धावा करत नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात आरसीबीने आक्रमक सुरूवात केली. सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्याने या सामन्यात पहिलीच धाव घेत विराटने मूठ दाबत सेलिब्रेशन केले आणि लगेचच वैभव अरोराला चार चौकार मारले. त्याने त्याचे गोलंदाजांवरील आक्रमण सुरूच ठेवले. त्याने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, मात्र ३.२ षटकांतच जेकब बेथेल १५ (१२) धावा करत बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या देवदत्त पडीक्कलने पुन्हा एकदा साजेशी खेळी केली.

पडीक्कलने विराटसोबत ९२ (५९) धावांची भागीदारी केली. तो ३९ (२७) धावा करत बाद झाला. नंतर आरसीबीच्या दोन विकेट्स लवकरच पडल्या. पाटीदार ११ धावा आणि टिम डेव्हिड २ धावा करत तंबूत परतले, मात्र एक बाजू विराटने लढवत संघाला विजय मिळवून दिला. त्याने १८.२ षटकात अरोराच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील नववे शतक ठरले. हे या स्पर्धेतील कोणत्याही फंलदाजाने केलेले सर्वाधिक शतक आहे, जोस बटलर ७ शतके करत दुसऱ्या स्थानी आहे. यावेळी केकेआरकडून कार्तिक त्यागीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

विराट सामनावीर ठरला असून आरसीबीने या विजयानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. त्यांचे १२ पैकी ८ सामन्यांमधील विजयाने १६ पॉइंट्स झाले आहेत. दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स असून त्यांचेही १६ पॉइंट्स आहेत, मात्र आरसीबीचा नेट रनरेट उत्तम आहे. तसेच या पराभवामुळे केकेआर आठव्या स्थानी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---