रविवारी (दि. 14 मे) चेन्नई सुपर किंग्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. आयपीएल 2023च्या 61व्या सामन्यात केकेआर संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने सुनील नारायण याच्यासोबत प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. या विकेट्समुळे चेन्नईला मोठे आव्हान उभे करता आले नाही. त्याचा फायदा केकेआरने घेतला. सामना गमावल्यानंतर सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी वरुण चक्रवर्तीबद्दल मोठे वक्तव्य केले.
काय म्हणाले फ्लेमिंग?
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठे भाष्य केले. ते म्हणाले की, आयपीएल लिलावात माजी नेट गोलंदाज वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याला न घेण्याची खंत आजही आहे. चक्रवर्तीने अनेक वर्षे चेन्नईचा नेट गोलंदाज आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्यासह चेन्नईच्या इतर फलंदाजांनाही त्रास दिला.
सामन्यानंतर फ्लेमिंग म्हणाले की, “आम्हाला वरुणला गमावण्याची खंत आजही आहे. त्याने अनेक वर्षे आम्हाला नेटमध्ये त्रास दिला. आम्ही लिलावात त्याला खरेदी करू शकलो नाहीत.”
वरुणला पंजाब किंग्स संघाने 2019मध्ये 8 कोटी 40 लाख रुपयांमध्ये ताफ्यात घेतले होते. तसेच, 2020मध्ये केकेआरने त्याला 4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्यानंतर अजूनही आपल्याकडेच ठेवले आहे.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, त्यांचा संघ परिस्थिती नीट समजू शकला नाही. ते म्हणाले की, “आम्ही परिस्थिती नीट समजण्यात अपयशी ठरलो. फलंदाजांसाठी हा कठीण सामना होता. सुरुवातीला खेळपट्टीमध्ये खूपच उसळी होती, जी हळूहळू कमी झाली. आम्ही या नवीन स्थितीत खेळण्याचे धडे घेत आहोत.”
चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी
केकेआरविरुद्धचा सामना गमावूनही चेन्नई संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. संघाने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यात संघाला विजय मिळवता आला आहे, तर उर्वरित 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तसेच, 1 सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे चेन्नई संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. (chennai super kings coach stephen fleming says not having varun chakaravarthy still hurts)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
धोनीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गावसकरांनी भेदला सुरक्षा घेरा, पळत जाऊन मारली मिठी, पाहा संपूर्ण व्हिडिओ
IPL 2023मध्ये का घेतल्या नाहीत जास्त विकेट्स? दिग्गज नारायणने दिले ‘हे’ खळबळजनक उत्तर, वाचाच