भारतात कोरोना व्हायरसच्या संकटाने सध्या थैमान घातले आहे. भारतातील अनेक राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. रोज लाखोंनी रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थिती भारतीय क्रीडासृष्टीतून अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. अनेक आयपीएलमधील संघांनीही विविधप्रकारे मदत देऊ केली आहे. आता यात चेन्नई सुपर किंग्स संघाचेही नाव जोडले गेले आहे.
सीएसकेने तमिळनाडूमधील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ४५० ऑक्सिजन संच दान करण्याचे ठरवले आहे. सीएसकेने यापूर्वीच आयपीएल २०२१ हंगाम सुरु असताना कोरोनाबद्दल जागरुकता पसरवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ‘मास्क पोडू’ ही मोहिम राबवली होती.
आता सीएसकेने सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या कोविड केअर सेंटर्ससाठी ४५० ऑक्सिजन संच देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडविरुद्धच्या लढाईत काम करत असलेली भूमिका ट्रस्ट, ही स्वयंसेवी संस्था चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडच्या या कार्यात मदत करत आहे. ही संस्था ऑक्सिजन संच पुरवठ्याची व्यवस्था आणि वितरणात समन्वय साधण्यासाठी सीएसकेची मदत करत आहे.
सीएसके दान करणार असलेल्या एकूण ४५० ऑक्सिजन संचांची पहिली खेप चेन्नईला पोहचली आहे. तसेच दुसरी खेप येत्या आठवड्याच्या सुरुवातीला पोहचेल असे फ्रँचायझीच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.
Thank you @TrustBhoomika for joining hands with us in this initiative, and helping us in arranging & distributing the Oxygen Concentrators.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 8, 2021
सीएसकेने राज्य सरकारकडे हे संच सोपवले आहेत. याबद्दल प्रसिद्धीपत्रकात माहिती देण्यात आली आहे की ‘चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडचे डायरेक्टर आर श्रीनिवासन यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याकडे एक ऑक्सिजन संच सोपवला आहे. यावेळी तमिळनाडू क्रिकेट मंडळाच्या अध्यक्ष रुपा गुरुनाथ देखील उपस्थित होत्या.’
Putting our best foot forward for Namma Tamizhagam! Pushing our wellness in hands with Hon. CM Mr. M.K. Stalin, as Mr. R. Srinivasan, Director, CSKCL, hands over an Oxygen Concentrator in the presence of Mrs. Rupa Gurunath, President, TNCA.
#Yellove 🦁💛 @chennaicorp @mkstalin pic.twitter.com/7FNKJSaJ4d— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 8, 2021
या योगदानाबद्दल सीएसके संघाचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी म्हटले की ‘सुपर किंग्ससाठी चेन्नई आणि तमिळनाडूचे लोक हृदयाच्या ठोक्यांप्रमाणे आहेत. आम्हाला त्यांना एवढेच सांगायचे आहे की या कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत आपण सर्व एकत्र आहोत.’
यापूर्वी अनेक खेळाडूंनी केला मदतीचा हात पुढे
यापूर्वीदेखील अनेक क्रिकेटपटू यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, हार्दिक आणि कृणाल पंड्या, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन, रिषभ पंत, विराट कोहली असे काही भारतीय खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स अशा आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
सीएसकेची आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी
आयपीएल २०२१ हंगाम कोरोनाच्या कारणामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित झाला. पण या हंगामात सीएसकेची कामगिरी चांगली झाली होती. त्यांनी पहिला सामना पराभूत झाल्यानंतर सलग ५ सामने जिंकले होते. त्यानंतर मात्र, त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. पण स्पर्धा स्थगित झाली तेव्हा सीएसके संघ ७ सामन्यांतील ५ विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पीटरसनने सांगितले ‘या’ कारणांमुळे सप्टेंबरमध्ये इंग्लंडला व्हावे उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचे आयोजन
कोरोनामुळे भारतीय क्रीडासृष्टीतील दोन तारे निखळले; एकाच दिवशी झाले दोन ऑलिंपिक सुवर्णपदकवीरांचे निधन