इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामातील पहिला सामना रंगणार आहे. तत्पुर्वी आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) मोठा धक्का बसला आहे.
सीएसकेचा वेगवान गोलंदाज गोलंदाज जोश हेजलवुड याने आयपीएल २०२१ मधून माघार घेतली आहे. त्यामुळे सीएसके हेजलवुडच्या पर्यायाच्या शोधात आहे. अशात सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाकडून खळबळजनक माहिती पुढे येत आहे.
सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले आहे की, “हा अचानक झालेला बदल आहे. आम्ही यासाठी आधीपासून तयार नव्हतो. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापुर्वी आम्ही जोश हेजलवुडच्या वेगवेगळ्या पर्यायांवर नजर टाकणार आहोत. परंतु आमच्याकडे आधीपासून प्रत्येक गोष्टीसाठी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे जर संघ व्यवस्थापनाला वाटले की, इतर पर्यायाची आवश्यकता नाही. तर आम्ही हेजलवुडच्या जागी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला संघात सहभागी करणार नाही.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे घेतली माघार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाला पाहता ३० वर्षीय हेजलवुडने यंदाच्या आयपीएल हंगाम कालावधीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना हेजलवुडने सांगितले होते की, “मागील १० महिन्यांपासून मी वेगवेगळ्या वेळी जैव सुरक्षित वातावरण आणि विलगीकरणात राहिलो आहे. त्यामुळे मी क्रिकेटमधून थोडा वेळ सुट्टी घेण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन मी माझ्या मायदेशी आणि माझ्या घरी काही वेळ घालवू शकेन. पुढील हिवाळी हंगाम आमच्यासाठी खूप मोठा असणार आहे.”
“ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा खूप मोठा असेल. बांगलादेशविरुद्धची टी२० मालिका वर्षाच्या शेवटच्या महिन्यात होईल. त्यानंतर टी२० विश्वचषक २०२१ आणि मग ऍशेस सीरिज. अशाप्रकारे पुढील १२ महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असताना मला मानसिक आणि शारिरिक रित्या स्वत:ला पूर्णपणे तयार ठेवायचे आहे. याच कारणामुळे मी आयपीएलचा यंदाचा हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पुढे मलाच फायदा होणार आहे,” असे त्याने पुढे सांगितले होते.
गतवर्षी तो चेन्नई संघाचा भाग होता. मात्र पूर्ण हंगामात त्याला अवघ्या ३ सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान त्याने ६४ धावा खर्च करत केवळ १ विकेट घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयासाठी आसुसलेल्या आरसीबीचे ‘हे’ नवोदित धुरंधर मारणार मैदान; प्रशिक्षकाने केला दावा
अय्यरच्या खांद्याची पुढील आठवड्यात होणार सर्जरी, आयपीएलसह ‘या’ मोठ्या स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता
क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिराती, ज्या तुम्हाला आठवण करुन देतात तुमचं बालपण