गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी चेन्नईयीन एफसीने विजयाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आणली. ईस्माईल गोन्साल्वीस याच्या पूर्वाधीतल दोन गोलांच्या जोरावर चेन्नईयीनने ओदिशा एफसीवर 2-1 असा विजय नोंदविला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास चेन्नईयीनकडे दोन गोलांची आघाडी होती. आघाडी फळीतील गिनी-बिसाऊचा 29 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू इस्माईल गोन्साल्वीस याने दोन्ही गोल केले. ओदिशाची पिछाडी दुसऱ्या सत्रात आघाडी फळीतील ब्राझीलचा 29 वर्षीय बदली खेळाडू दिएगो मॉरीसिओ याने 63व्या मिनिटाला कमी केली.
चेन्नईयीनने 11 सामन्यांत तिसराच विजय नोंदविला असून पाच बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 14 गुण झाले. त्यांनी आठवरून थेट पाचवा क्रमांक गाठला. आता तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबाद आणि गोवा यांच्यापेक्षा ते केवळ एका गुणाने मागे आहेत. पाच सामन्यांत चेन्नईयीनला प्रथमच विजय मिळाला. आधीच्या लढतीत ओदिशाविरुद्धच त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ओदिशाचे तळातील 11वे स्थान कायम राहिले. 11 सामन्यांत त्यांना सातवी हार पत्करावी लागली. एक विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे सहा गुण व अखेरचे स्थान कायम राहिले.
मुंबई सिटी एफसी 10 सामन्यांतून आठ विजयांसह 25 गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 10 सामन्यांत सहा विजयांसह त्यांचे 20 गुण आहेत. हैदराबाद एफसी व एफसी गोवा यांचे प्रत्येकी 15 गुण आहेत. दोन्ही संघांचा गोलफरक 2 असा समान आहे. यात गोव्यापेक्षा दोन गोल जास्त केले असल्याने (15-13) हैदराबादचा तिसरा क्रमांक आहे.
खाते उघडण्याची शर्यत चेन्नईयीनने जिंकली. इस्माईलला चेंडूवर ताबा मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न ओदिशाचा बचावपटू गौरव बोरा याने केला, पण तो अपयशी ठरला. चेंडू आपल्या दिशेने येताच इस्माईलने नेटच्या दिशेने घोडदौड करीत ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्या डोक्यावरून चेंडू नेटमध्ये मारला.
चेन्नईयीनच्या दुसऱ्या गोलला बोराच कारणीभूत ठरला. मध्य क्षेत्रात ओदिशाने चेंडूवरील ताबा गमावताच चेन्नईयीनचा मध्यरक्षक अनिरुध थापा याने संधी साधली. त्याने इस्माईलच्या साथीत घोडदौड सुरु केली. त्याचवेळी बोराने थापाला बॉक्समध्ये पाडले. त्यामुळे रेफरी रणजीत बक्षी यांनी चेन्नईयीनला पेनल्टी बहाल केली. इस्माईलनेच ती घेतली आणि चेंडू नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारला. अर्शदीपने अंदाज चुकल्याने विरुद्ध दिशेला झेप घेतली.
दुसऱ्या सत्रात ओदिशाची गोलची प्रतिक्षा संपली. मार्सेलो परेरा याच्या जागी बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या दिएगोने हा गोल केला. मध्य फळीतील कोल अलेक्झांडर याने ही चाल रचली. त्याने हेडिंगवर चेंडूला दिएगोच्या दिशेने मारले. प्रतिस्पर्धी बचावपटू मध्ये असूनही दिएगोने आगेकूच केली आणि नेटच्या उजव्या दिशेने फटका मारत चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याला चकविले.
संबधित बातम्या:
आएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्टविरुद्ध भेकेच्या गोलमुळे बेंगळुरूला बरोबरीचा दिलासा
आयएसएल २०२०-२१ : ओगबेचेच्या गोलमुळे मुंबई सिटीचा एटीके मोहन बागानला शह
आयएसएल २०२० : ब्लास्टर्सला धक्का देत ओदिशाचा पहिला विजय