गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात एकवेळ बाद फेरीपूर्वीच आव्हान आटोपण्याची शक्यता निर्माण झालेल्या चेन्नईयीन एफसीने थेट अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत एफसी गोवा संघाला ऍग्रीगेटवर 6-5 असे एकमेव गोलच्या फरकाने चकवित चेन्नईयीनने ही किमया साधली. गोव्याने घरच्या मैदानावर दुसऱ्या टप्याचा सामना 4-2 असा जिंकला, पण चेन्नईयीनमधील दारुण पराभव त्यांना अखेरीस भोवला.
चेन्नईयीनला घरच्या मैदानावर एकच गोल पत्करावा लागला होता. यावेळी गोव्याविरुद्ध फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर दुसऱ्या सत्रात झटपट दोन गोल करीत चेन्नईयीननने पकड घेतली. ओवेन कॉयल यांच्या संघाला आता 14 मार्च रोजी येथेच अंतिम फेरी खेळण्याची संधी मिळाली आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यातील दुसऱ्या टप्याचा सामना एटीके आणि बेंगळुरू एफसी यांच्यात रविवारी होत आहे. यातील विजयी संघाविरुद्ध चेन्नईयीन खेळेल.
खडतर आव्हान असलेल्या गोव्याला खाते उघडण्यात दैवाची साथ मिळाली. प्रतिस्पर्धी कर्णधार ल्युचियन गोएन याच्याकडून स्वयंगोल जाला. उजवीकडे जॅकीचंद सिंग याच्या दिशेने चेंडू मारण्यात आला.
त्याने गोलक्षेत्रात मारलेला चेंडू हेडींगने अडविण्याच्या प्रयत्नात गोएन अचूकता दाखवू शकला नाही. त्यामुळे चेंडू चेन्नईयीनच्याच नेटमध्ये गेला. त्यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ यालाही धक्का बसला.
गोव्याचा दुसरा गोल 21व्या मिनिटाला झाला. गोव्याच्या अहमद जाहौह याने मारलेला चेंडू मध्य फळीतील लेनी रॉड्रीग्ज याच्या दिशेने गेला. त्यावेळी चेन्नईयीनच्या अनिरुध थापा याने लेनीला पाडले. त्यामुळे गोव्याला फ्री किक मिळाली.
ब्रँडन फर्नांडीस याने अप्रतिम फटका मारला. त्यावेळी मुर्तडा फॉल याने प्रतिस्पर्धी बचावपटू एली साबिया याच्यापेक्षा उंच उडी घेत ताकदवान हेडिंग केले.
दुसऱ्या सत्रात चेन्नईयीनने सात मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. 52व्या मिनिटाला अनिरुध थापाने रॅफेल क्रिव्हेलारोला पास दिला. क्रिव्हेलारोने मुर्तडा फॉल याला चकवून फटका मारला. गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ चेंडू नीट अडवू शकला नाही.
त्यामुळे मिळालेल्या संधीचा छांगटेने फायदा घेत गोल केला. त्यानंतर क्रिव्हेलारोने घेतलेल्या कॉर्नरवर वॅल्सकीस याने हेडिंगवर गोल केला.
त्यावेळी चेन्नईयीनकडे 6-3 असे वर्चस्व होते. गोव्याला बरोबरी साधून लढत अतिरीक्त वेळेत घालविण्यासाठी तीन गोल करणे अटळ होते. त्यांना दोनच गोल करता आले.
एदू बेदीया याने 81व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर फॉलने दोन मिनिटांनी वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल केला. त्यामुळे एकूण पिछाडी 5-6 अशी एका गोलपर्यंत कमी झाली. त्यानंतर मात्र गोव्याला आक्रमक खेळाचे प्रदर्शन करता आले नाही. त्यातच भरपाई वेळेत बदली खेळाडू सेव्हीयर गामा याला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले.
अंतिम टप्यात दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल करीत गोव्याने सुमारे 19 हजार प्रेक्षकांच्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण त्यांना अखेरीस पराभूत व्हावे लागले.