आज(21 जूलै) बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ घोषित केले आहेत. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या विंडीज दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियशिपचा भाग असेल.
कसोटी संघात भारताचा फलंदाज रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान सहाने पुनरागमन केले आहे. सहाच्या पुनरागमनाने मात्र आंध्रप्रेदेशचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला भारतीय संघातील संधीसाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
भरत हा भारताच्या कसोटी संघात संधी मिळवण्याच्या खूप जवळ होता. पण सहाला संधी मिळाल्याने त्याचा संघात समावेश करण्यात न आल्याचे भारतीय निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसाद पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘आम्ही भारतीय अ संघातील कामगिरीही लक्षात घेतली होती. श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे तसेच नवदीप सैनीची कामगिरी शानदार झाली आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये केएस भरत भारतीय संघात निवड होण्याच्या खूप जवळ होता.’
‘पण एक नियम आहे की जर एखादा वरिष्ठ खेळाडू किंवा संघात नियमित असलेला खेळाडू जर दुखापतीतून पुनरागमन करत असेल तर त्याला संघात संधी दिली जावी. त्यामुळे वृद्धीमान सहाला पुनरागमनाची संधी दिली आहे.’
‘पण मी सांगू शकतो की केएस भरतने भारतीय अ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. त्याने 3 शतके आणि यष्टीमागे जवळपास 50 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो संधी मिळण्याच्या खूप जवळ होता.’
भरतने त्याच्या भारत अ संघाकडून खेळलेल्या मागील 11 सामन्यात 686 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतके केली आहेत. तसेच 41 झेल आणि 6 यष्टीचीत केले आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया अ, इंग्लंड अ(इंग्लंड लायन्स) आणि श्रीलंका अ संघाविरुद्ध शतके केली आहेत.
तसेच त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 65 प्रथम श्रेणी सामन्यात 38.75 च्या सरासरीने 3798 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 8 शतकांचा 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 222 झेल आणि 27 यष्टीचीत केले आहेत.
विंडीज दौऱ्यासाठी असा आहे भारताचा कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; या युवा खेळाडूंना मिळाली संधी
–डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एचने विश्वविजेत्या इंग्लंडला दिली ही खास भेट
–या कारणामुळे सचिनचा झाला द्रविड, कुंबळेनंतर हॉल ऑफ फेममध्ये समावेश