मोहाली। सोमवारी(8 एप्रिल) आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा पंजाबचा या मोसमातील चौथा विजय आहे.
या सामन्यानंतर पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल चाहत्यांबरोबर विजयाचा आनंद साजरा करताना दिसला आहे.
हा सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर पंजाबचा संघ येत असताना त्यांचे चाहत्यांनी शानदार स्वागत केले. यावेळी या चाहत्यांनी पंजाबची जर्सी घातली होती आणि ते ढोल वाजवत स्वागत करत होते. त्यावेळी गेलनेही डान्स करत या चाहत्यांना खूश केले. तसेच गेल डान्स करत असताना त्याचा संघसहकारी सॅम करन हा त्याचा व्हिडिओ काढतानाही दिसला आहे.
गेलच्या या डान्सचा व्हिडिओ किंग्ज इलेव्हन पंजाबने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे की ‘चांगल्या दिवसाचा शेवट ‘यूनिवर्स बॉस’ स्टाईलने.’
https://twitter.com/lionsdenkxip/status/1115338012760596480
या सामन्यात डेव्हि़ड वॉर्नरने केलेल्या 70 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 150 धावा केल्या आणि पंजाबसमोर 151 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबलाही शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला.
पण अखेर केएल राहुलने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव काढत पंजाबला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. पंजाबकडून राहुलने 53 चेंडूत नाबाद 71 धावांची आणि मयंक अगरवालने 43 चेंडूत 55 धावांची खेळी करत पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यात गेलला फलंदाजीमध्ये खास काही करता आले नाही. तो 16 धावांवर बाद झाला.
गोलंदाजीमध्ये पंजाबकडून मुजीब उर रेहमान, मोहम्मद शमी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. तर हैद्राबादकडून संदीप शर्माने दोन विकेट, राशिद खान आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–असे होणार आहेत टीम इंडियाचे २०१९ विश्वचषकाआधी सराव सामने
–या गोष्टीचा विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडताना विचार केला जाणार नाही!





