ऑस्ट्रेलिया संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील तिसरा टी -२० सामना मंगळवारी (१३ जुलै ) पार पडला. गेल्या २ सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. परंतु, या सामन्यात त्याने चौफेर फटकेबाजी केली. याच खेळीदरम्यान त्याने रिले मेरेडिथच्या षटकात असा काही अफलातून षटकार लगावला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ख्रिस गेल हा टी-२० क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून का ओळखला जातो, याचे उत्तर तो नेहमी आपल्या बॅटने देत असतो. या सामन्यात देखील तो ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथने १४४ किमी प्रति तासाच्या वेगाने चेंडू टाकला, त्या चेंडूवर ख्रिस गेलने लेग साईडच्या दिशेने गगनचुंबी षटकार मारला. त्याच्या याच तडाखेबंद फटकाजीमुळे वयाची चाळिशी ओलांडलेला हा फलंदाज अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून वावरत आहे.(Chris Gayle hit a miraculous six on the ball at a speed of 144 kmph of Riley meredith watch video)
चांगला टप्पा आणि गती असताना देखील गेलने या चेंडूला स्टँडमध्ये पाठवले, हे पाहून गोलंदाज देखील आश्चर्यचकित झाला होता. गेल्या काही सामन्यांपासून तो लवकर बाद होत होता. ज्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात होती. परंतु, त्याचे संघ सहकारी कायरन पोलार्ड आणि ब्रावो यांनी त्याला सहकार्य केले होते. चांगली खेळी केल्यानंतर गेलने दोघांचेही आभार मानले आहेत.
त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने ६७ धावा केल्या होत्या. ही खेळी त्याने ब्रावो आणि पोलार्डला समर्पित केली होती. याच सामन्यात त्याने टी-२० क्रिकेट कारकिर्दीमध्ये १४,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत वेस्ट इंडिजने पहिले तीनही सामने जिंकून ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
यशपाल शर्मा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला होता घाम, पाहा त्यांनी मारलेला गगनचुंबी षटकार






