इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांदरम्यान खेळला जाईल. या संपूर्ण हंगामामध्ये जगभरातील अव्वल क्रिकेटपटूंनी आपले कौशल्य दाखविले. मात्र, या हंगामात भारताच्या युवा क्रिकेटपटूंनी खर्या अर्थाने प्रसिद्धी मिळवली. सर्व संघातील विविध खेळाडूंनी प्रत्येक वेळी दमदार कामगिरी करून संघाच्या विजयात हातभार लावला. आज आपण त्याच चार ‘एमर्जिंग प्लेयर’ विषयी जाणून घेऊया.
१) ऋतुराज गायकवाड
मागील आयपीएलच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याने या वर्षी देखील आपल्या बॅटने धुरंधर गोलंदाजांना चांगलेच फोडून काढले. संघ अडचणीत असताना त्याने नेहमी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. त्याने हंगामात आतापर्यंत १५ सामने खेळताना ६०४ धावा चोपल्या आहेत. तो यावर्षी एमर्जिंग प्लेयर होण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.
२) व्यंकटेश अय्यर
आयपीएलच्या उत्तरार्धात ज्या युवा खेळाडूने आपल्या खेळाने सर्वाधिक प्रभावित केले तो खेळाडू म्हणजे कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर होय. त्याने या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळताना तीन अर्धशतकाच्या मदतीने ३२० धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात त्याने शानदार अर्धशतक ठोकून संघाला विजयी मार्गावर नेले होते.
३) अर्शदीप सिंग
आपला दुसरा हंगाम खेळत असलेला पंजाबचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या हंगामात अनेक वेळा पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने संपूर्ण हंगामात भेदक गोलंदाजी करताना केवळ १२ सामन्यात १८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने अनेक वेळा डेथ ओवर्समध्ये शानदार गोलंदाजी केली.
४) यशस्वी जयस्वाल
भारताला २०२० च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या यशस्वी जयस्वालने आयपीएलच्या या हंगामात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवाराची भूमिका बजावताना १० सामन्यात १४८ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने २४९ धावा फटकावल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! सतरा वर्षीय शेफालीने पहिल्याच सामन्यात रॉकेट थ्रो मारून फलंदाजाला केले धावबाद; एकदा पाहाच
केकेआर-सीएसकेची लढत पाहण्यासाठी चाहत्यांच्या संयमाचा तुटला बांध; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
‘अरे भावा रामनवमी नाही महानवमी,’ रिषभ पंत ‘असं’ ट्वीट केल्याने झाला ट्रोल