भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी बुधवारी (७ जुलै) आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीला जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी व खेळाडू वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. धोनीने ऑस्ट्रेलियात मारलेल्या काही षटकारांची आठवण चाहत्यांना या व्हिडिओमधून येईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला व्हिडिओ
एमएस धोनी हा जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे. त्याच्या वाढदिवशी चाहते व विविध क्षेत्रातील मान्यवर त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील त्याला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक मिनिट ४० सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनीने ऑस्ट्रेलियात मारलेले काही षटकार आपण पाहू शकतो.
धोनीने २०१५ विश्वचषकासह एकूण सहा वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांवर तो लीलया षटकार मारताना दिसून येतो. २०१२ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी त्याने ॲडलेड वनडेमध्ये वेगवान गोलंदाज क्लिंट मॅके याला मारलेला ११२ मीटरचा गगनचुंबी षटकार क्रिकेट चाहते अजूनही विसरले नाही.
📽 WATCH: MS Dhoni's best ever sixes in Australia. https://t.co/tRadt6XCkI
— cricket.com.au (@cricketcomau) July 7, 2021
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे धोनी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच आपल्या आक्रमक फलंदाजीने धोनीने सर्वांची मने जिंकली होती. त्यानंतर, २००७ मध्ये त्याला भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले व त्याने संघाला विजेतेपदापर्यंत मजल मारून दिली. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने २८ वर्षानंतर २०११ मध्ये वनडे विश्वचषक उंचावला. २०१३ मध्ये इंग्लंड येथेझालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत त्याने भारताला सर्व आयसीसी ट्रॉफी मिळवून देण्याचा कारनामा केला. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो अजुनही आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: ‘असा’ पराक्रम करणारा एमएस धोनी आहे केवळ दुसराच यष्टीरक्षक
दिलीप कुमार यांचे क्रिकेटची होते जवळचे नाते, चॅरिटी सामन्यात केले होते संघाचे नेतृत्व
‘तू जळकुकडा आणि वैफल्यग्रस्त आहेस’, धोनीच्या वाढदिवशी गंभीर आला चाहत्यांच्या निशाण्यावर