भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने भारतासाठी ३ आयसीसी स्पर्धाचे विजेतेपद जिंकले आहे. तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा केवळ भारताचाच नाही तर जगातील एकमेव कर्णधार आहे.
धोनीने केवळ कर्णधार म्हणून संघाला विजेतेपदे व विजय मिळवून दिले नाही, तर कठीण काळातही त्याने अनेक खेळाडूंचे समर्थन केले आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात अशा अनेक खेळाडूंचे समर्थन केले, जे नंतर भारतीय संघासाठी तारणहार ठरले.
आपण अशा पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांना एमएस धोनीने पाठिंबा दिला होता. त्यानंतर, या खेळाडूंनीही कर्णधाराचा विश्वास टिकवून भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी बजावली.
५. रोहित शर्मा ( Rohit Sharma )
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण, कारकिर्दीच्या सुरूवातीच्या बर्याच दिवस रोहितने मधल्या फळीत फलंदाजी केली. त्यावेळी त्याची कामगिरी काही खास झाली नाही. त्याला एकवेळी संघातूनही वगळण्यात आले. पण नंतर त्याची क्षमता पाहून कर्णधार एमएस धोनीने त्याला मधल्या फळीऐवजी सलामीची संधी दिली.
साल २०१३ मध्ये शिखर धवनसह रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नियमित सलामीवीर म्हणून खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर, रोहितने मागे वळून पाहिले नाही. रोहितच्या नावे आज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम आहेत.
कर्णधार धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सलामीला संधी दिली नसती, तर कदाचित भारतीय संघाला ‘हिटमॅन’ मिळाला नसता. रोहितचा इतका मोठा स्टार खेळाडू बनण्यामागे कर्णधार धोनीचा मोठा हात आहे.
सलामीला आल्यापासून रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावली आहेत. टी२० क्रिकेटमध्ये ४ शतके त्याच्या नावे आहेत. सलामीवीराची भूमिका पार पाडत असल्यापासून त्याची वनडे क्रिकेटमधील सरासरी तब्बल ५८.२३ इतकी जबरदस्त आहे.
४. जोगिंदर शर्मा ( Joginder Sharma )
भारतीय क्रिकेट संघाने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले होते. त्या विश्वचषकाचे अंतिम षटक टाकणारा गोलंदाज म्हणजे जोगिंदर शर्मा.
हरियाणाचा माजी गोलंदाज जोगिंदर शर्मा हा धोनीने अंतिम सामन्यात अंतिम षटक दिल्याने नायक बनला होता. त्या एका षटकाने जोगिंदर शर्माच्या कारकिर्दीला धोनीने नवीन जीवन दिले.
खरं तर, शेवटच्या षटकात कोणीही विचार केला नव्हता की धोनी चेंडू जोगिंदरकडे देईल, परंतु धोनीने आपल्या हुशारीचा उपयोग करून चेंडू जोगिंदरच्या हातात दिला आणि कर्णधाराचा विश्वास टिकवून ठेवताना जोगिंदरने मिस्बाहला बाद केले आणि भारताला पहिलावहिला टी२० विश्वचषक जिंकून दिला.
३. इशांत शर्मा ( Ishant Sharma )
भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा कदाचित आज वनडे आणि टी२० संघाचा भाग नाही, परंतु भारतीय कसोटी संघाच्या गोलंदाजीचा तो प्रमुख आधारस्तंभ आहे. इशांत शर्माच्या कारकीर्दीची सुरुवात अनिल कुंबळेच्या नेतृत्वात झाली आणि त्याने आपल्या शानदार वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
परंतु, काही काळानंतर धोनीच्या नेतृत्वात इशांत शर्मा आपली लय गमावताना दिसला. पण धोनीने या वेगवान गोलंदाजावर विश्वास दाखवत त्याला संघात ठेवले. वाईट काळातही इशांत शर्माला साथ देऊन धोनीने त्याचे बुडती कारकिर्द वाचवली.
सध्या इशांत हा बुमराह, भुवनेश्वर, शमी, उमेश यादव या वेगवान गोलंदाजी करणाऱ्या तोफखान्याचा सर्वात वरिष्ठ वेगवान गोलंदाज आहे.
एकवेळ भारतीय संघाच्या बाहेर जायच्या वाटेवर असलेला ईशांत आज भारतासाठी ९७ कसोटी खेळलाय.
२. सुरेश रैना ( Suresh Raina )
सुरेश रैना हा काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील सर्वात मजबूत फलंदाज मानला जात होता. रैनाने धोनी आणि युवराज सिंग यांच्यासह भारतीय संघाची मधली फळी बरीच वर्षे सांभाळली. पण त्याच्या कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा तो सतत अपयशी ठरला होता.
काही वर्षांपूर्वी रैनाला वनडे क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी करता येत नव्हती, परंतु धोनीला त्याची क्षमता माहीत होती आणि त्याने रैनाला संघात ठेवले. रैनाने धोनीच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे आपली कारकीर्द तयार केली.
पण विराट कोहली कर्णधार झाल्यानंतर, आता सुरेश रैनाची कारकीर्द संपल्याचे दिसत आहे. २०१८ पासून रैनाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तो सध्या फक्त आयपीएल खेळतो.
रैनाने भारतासाठी १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ टी२० सामने खेळले आहेत. काही दिवसांपूर्वी रिषभ पंत सोबत त्याला सराव करताना पाहिले गेले होते.
१. रविंद्र जडेजा ( Ravindra Jadeja )
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू रविंद्र जडेजा हा देखील या यादीत समाविष्ट आहे. जडेजा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा अष्टपैलू आहे.
परंतु , धोनीच्या नेतृत्वात जडेजाची कारकीर्द जोपासली गेली. जडेजाने काही वर्षे चांगली कामगिरी केली परंतु नंतर तो फ्लॉप होऊ लागला. प्रत्येक खेळाडू आपल्या कारकीर्दीत उतार-चढाव पाहतो, त्या दरम्यान त्याला कर्णधाराच्या आधाराची आवश्यकता असते, जेणेकरुन त्याला लय परत मिळू शकेल.
जडेजाच्या कारकीर्दीच्या मध्यभागी असा एक काळ होता जेव्हा तो संघामधून बाहेर पडण्याच्या काठावर उभा होता, परंतु धोनीने त्याला पाठिंबा दिला आणि जडेजाची कारकिर्द वाचवली. आता जडेजा हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार विराट कोहलीची पहिली पसंती बनला आहे.
काही दिवसांपूर्वीच, विस्डेनने घेतलेल्या सर्वेक्षणात जडेजाला २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे.
वाचनीय लेख –
सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडू शकणारे ५ भारतीय
अनिल कुंबळे यांनी विश्वास दाखवलेले खेळाडू जे रवी शास्त्री यांच्या काळात आहेत संघाबाहेर
वनडेत कधीही शुन्यावर बाद न होणारे ५ क्रिकेटपटू, एक आहे भारतीय