---Advertisement---

गांगुली, सचिन ते डिविलियर्स, भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेटविश्वातून उमटल्या अशा प्रतिक्रिया, पाहा खास ट्विट्स

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 3:15 AM
---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. सोमवारी (६ सप्टेंबर) या सामन्याच्या अखेरच्या दिवसाच्या अखेरच्या सत्रापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

याबरोबरच ओव्हलच्या मैदानातील भारताचा हा केवळ दुसराच विजय ठरला. यापूर्वी भारताने तब्बल ५० वर्षांपूर्वी म्हणजेच १९७१ साली पहिल्यांदाच ओव्हलवर कसोटी विजय मिळवला होता. त्यामुळे भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातून संघाचे कौतुक होत आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ट्विट केले आहे की ‘शानदार कामगिरी, कौशल्य हा फरक आहे, पण सर्वात मोठा फरत म्हणजे दबाव शोषूण घेणे हा आहे. भारतीय क्रिकेट हे अन्य सर्वांपेक्षा खूप पुढे आहे.’

याबरोबरच भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट केले आहे की ‘अफलातून पुनरागमन! प्रत्येक पिछाडीनंतर खेळाडूंनी सातत्याने पुनरागमन केले. इंग्लंड संघ ७७ धावांवर बिनबाद असतानाही शेवटच्या दिवशी विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा काय मार्ग होता. पुढे जात राहा आणि मालिकेत ३-१ अशा फरकाने जिंका.’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

एवढेच नाही, तर शेन वॉर्न, एबी डिविलियर्स सारख्या परदेशी दिग्गजांनीही भारतीय संघाचे कौतुक केले आहे. वॉर्नने म्हटले की ‘शानदार विजयाबद्दलविराट कोहली आणि भारतीय संघाचे अभिनंदन. तुम्ही गेल्या १२ महिन्यांत जे काही यश मिळवले आहे ते भव्य आहे. नक्कीच सध्या जगातला सर्वात उत्कृष्ट कसोटी संघ आणि तुम्ही या कौतुकासाठी पात्र आहात. कसोटी क्रिकेट असेच जिवंत राहो.’

डिविलियर्सने दोन ट्विट्स केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की ‘कसोटी क्रिकेटचे “प्रेक्षक” म्हणून, संघ निवड आणि इतर मूर्खपणाची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या डोळ्यांसमोर उलगडत जाणाऱ्या स्पर्धा, जिद्द, कौशल्य आणि देशभक्तीचे कौतुक करा. तुम्ही एक चांगला सामना पाहाणे चुकवत आहात.’

तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की ‘भारतीय संघ मस्त खेळलात. विराट तुझे नेतृत्व चांगले होते आणि खेळाडूंनी दाखवलेले वैयक्तिक कौशल्य आणि जिद्द शानदार होती. त्याचबरोबर जो रुट आणि इंग्लंड तुम्ही चांगले खेळलात. एका चांगल्या खेळाची तुम्ही चांगली जाहीरात केलीत. आता अखेरच्या सामन्यासाठी उत्सुक आहे.’

याशिवाय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा, तसेच अन्य सदस्यांनीही या विजयानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १९१ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा करत ९९ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार खेळ केला.

दुसऱ्या डावात भारताकडून रोहित शर्माने शतकी खेळी केली. त्याने १२७ धावा केल्या. तसेच चेतेश्वर पुजारा (६१), रिषभ पंत (५०) आणि शार्दुल ठाकूर (६०) यांनी अर्धशतकी खेळी केली. याशिवाय केएल राहुलने ४६ आणि विराट कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे भारताने ४६६ धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. त्यांचे सलामीवीर रॉरी बर्न्स(५०) आणि हसीब हमीद(६३) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडला आणि इंग्लंड संघ केवळ २१० धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

अनंत आमुची ध्येयसक्ती! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रेफ्युजी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ६ खेळाडूंची संघर्षगाथा

एबी डिव्हिलियर्सने यूएईमध्ये लावली हजेरी; मॅक्सवेल, जेमिसन यांचेही ‘या’ दिवशी होणार आगमन

“जर कोणी शार्दुल ठाकूरचा फॅन क्लब काढला, तर मला त्याचा पहिला सदस्य बनयला आवडेल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---