भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनसाठी गेलं एक वर्ष खूपच खडतर राहिलं आहे. प्रथम त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आलं. त्यानंतर त्याला बीसीसीआयचा वार्षिक करार देखील मिळाला नाही. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून देखील त्याला भारतीय संघात जागा मिळत नाहीये. आश्चर्याचं म्हणजे, त्याच्या नावाची देखील कुठे चर्चा नाही.
या सर्व बातम्यांदरम्यान इशान किशनच्या भविष्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, इशाननं एक नवी स्पोर्ट्स अकादमी सुरू केली. या अकादमीचं नाव त्यानं ‘द इशान किशन अकादमी’ असं ठेवलं आहे. ही अकादमी ‘द इका’ या नावाने ओळखली जाईल. आधुनिक सुविधांयुक्त या अकादमीत युवा खेळाडूंना क्रिकेटचे बारकावे शिकवले जातील. इशाननं सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची माहिती दिली.
इशान किशनबद्दल बोलायचं झाल्यास, तो आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसेल. हैदराबादनं आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्याच्यावर 11.25 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात शामील करून घेतलं होतं. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता.
इशानला भारतीय संघात जागा मिळत नसली, तरी त्याच्या टीम इंडियासाठीची कामगिरी शानदार राहिली आहे. तो भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणाऱ्या इशाननं भारतासाठी 2 कसोटीत 78 धावा, 27 वनडेंमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 933 धावा तसेच 32 टी20 मध्ये 6 अर्धशतकांसह 796 धावा केल्या आहेत. आता आगामी आयपीएल 2025 मध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा –
मनु भाकर-डी गुकेशसह इतर चौघांना खेलरत्न अवाॅर्ड, तर स्वप्नील कुसळेसह या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ranji trophy; मोठ्या मनाचा रिषभ, संघाच्या हितासाठी घेतला मोठा निर्णय!
प्रतीक्षा संपली..! स्टार गोलंदाज टीम इंडियामध्ये सामील होण्यास तयार; शेअर केला खास व्हिडिओ