भारतात सुरू असलेला विश्वचषक 2023 गाजवणाऱ्या परदेशी प्रतिभावान खेळाडूंपैकी एक म्हणजे रचिन रवींद्र होय. न्यूझीलंडला विश्वचषक उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी 23 वर्षीय रचिनने सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने आपल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत 3 शतक ठोकत क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. याव्यतिरिक्त रचिन त्याच्या नावामुळेही चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याने स्वत: सांगितले होते की, कशाप्रकारे त्याचे नाव भारताचे महान फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नावाच्या मिश्रणाने ठेवले गेले आहे. मात्र, आता मोठी बातमी समोर येत आहे. रचिन रवींद्रचे वडील रवी कृष्णमूर्ती (Ravi Krishnamurthy) यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, ते म्हणाले की, त्यांनी रचिन रवींद्रचे नाव सचिन आणि द्रविड यांच्या नावावरून ठेवले नव्हते, तर याविषयी त्यांना बऱ्याच वर्षांनंतर समजले होते.
रवींद्रचे वडील कृष्णमूर्ती यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जेव्हा रचिनचा जन्म झाला, तेव्हा माझ्या पत्नीने नाव सुचवले आणि आम्ही यावर चर्चा करण्यात जास्त वेळ घालवला नाही. नाव चांगले वाटत होते, उच्चार करणे सोपे होते आणि छोटे होते. त्यामुळे आम्ही हेच नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर आम्हाला जाणवले की, हे नाव राहुल आणि सचिनच्या नावांचे मिश्रण होते. त्यांचे नाव आमच्या मुलाला क्रिकेटपटू किंवा असे काही बनवण्याच्या इराद्याने ठेवले नव्हते.”
कृष्णमूर्ती स्वत: क्रिकेट खेळायचे. ते म्हणतात की, त्यांनी आपल्या मुलांना आपल्या आवडीने कोणतेही क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. पुढे बोलताना ते म्हणाले, “आई-वडील म्हणून आमच्या आशा आमची मुले जे काही क्षेत्र निवडतात, तिथपर्यंत असतात. जेव्हा रचिनने क्रिकेटची आवड व्यक्त केली, तेव्हा आम्ही पूर्ण पाठिंबा दिला आणि आशा आहे की, तो यामध्ये यश मिळवेल. अगदी तसाच पाठिंबा आम्ही आमच्या मुलीलाही तिने निवडलेल्या मार्गासाठी देऊ.”
रचिनची कामगिरी
रचिन रवींद्र याची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर त्याने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात त्याने 70.62च्या सरासरीने 565 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 2 अर्धशतके निघाली आहेत. विशेष म्हणजे, विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो विराट कोहली (594) आणि क्विंटन डी कॉक (591) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे. (cricketer rachin ravindra father reveals his son not named after sachin and dravid)
हेही वाचा-
आख्ख्या वर्ल्डकपमध्ये फक्त रोहितचाच रुबाब! ‘हे’ आहेत वर्ल्डकप 2023मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे 5 धुरंधर
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ‘गंजते’ कोहलीची बॅट, 2011पासून करतोय ‘विराट’ संकटाचा सामना; आकडे भीतीदायक