इंग्लंडमध्ये सध्या पुरुष आणि महिला ऍशेस मालिकेचे आयोजन केले जात आहे. एकीकडे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पुरुष क्रिकेटपटू आमने-सामने आहेत. तसेच, दुसरीकडे इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला आमने-सामने आहेत. महिला संघ ऍशेसमधील एकमेव कसोटी कसोटीत भिडताना दिसत आहेत. महिला ऍशेस कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ती फलंदाज इतर कुणी नसून टॅमी ब्यूमाँट आहे. तिने 88 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून खास यादीत स्थान पटकावले आहे.
टॅमी ब्यूमाँट (Tammy Beaumont) हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाँटिंघम येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले. तिने 331 चेंडूंचा सामना करताना 27 चौकारांच्या मदतीने 208 धावांची वादळी खेळी साकारली. ब्यूमाँट ही कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी इंग्लंडची पहिलीच महिला क्रिकेटपटू बनली आहे. यापूर्वी टॅमीची सर्वोत्तम धावसंख्या ही 70 इतकी होती.
मोडला 88 वर्षे जुना विक्रम
टॅमीने यादरम्यान इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू बेटी स्नोबॉल हिचा 88 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त केला. यापूर्वी बेटी स्नोबॉल हिच्या नावावर इंग्लंडकडून महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम होता. तिने 88 वर्षांपूर्वी हा विक्रम केला होता. तिने 16 जून 1935 रोजी न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथील सामन्यात 189 धावांची खेळी साकारली होती. ही महिला कसोटी क्रिकेटमधील एकूण चौथी सर्वोच्च खेळी होती. या कसोटीत इंग्लंडने एक डाव आणि 335 धावांनी विजय मिळवला होता.
टॅमीने रचेल हेहोऊ फ्लिंट हिचा विक्रमही मोडीत काढला आहे. रचेलने जुलै 1976मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 179 धावांची खेळी साकारली होती. टॅमीला 208च्या वैयक्तिक धावसंख्येवर ऍश्ले गार्डनर हिने बाद केले. टॅमी तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक झळकावणारी हीथर नाईटनंतरची इंग्लंडची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.
टॅमी 32 वर्षांची असून ती महिला ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी हिच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडण्यापासून फक्त 5 धावा मागे राहिली. पेरीने 2017मध्ये नाबाद 213 धावांची खेळी साकारली होती. टॅमी द्विशतक झळकावणारी दुसरी सलामीवीर खेळाडू आहे. तिच्यापूर्वी पाकिस्तानच्या किरण बलूच हिने वेस्ट इंडिजविरुद्ध 2004मध्ये हा कारनामा केला होता. त्यावेळी ती 584 चेंडूत 242 धावांवर बाद झाली होती.
कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या महिला खेळाडू
मिशेल गोस्स्को (ऑस्ट्रेलिया) – 204 धावा
किरण बलूच (पाकिस्तान)- 242 धावा
किरन फ्लेवेल (न्यूजीलंड)- 204 धावा
जोआन ब्रॉडबेंट (ऑस्ट्रेलिया)- 200 धावा
टॅमी ब्यूमाँट (इंग्लंड)- 208 धावा
एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)- 213 धावा*
मिताली राज (भारत)- 214 धावा
कॅरेन लुईस रोल्टन (ऑस्ट्रेलिया)- 209 धावा*
या सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 473 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने पहिल्या डावात 463 धावा केल्या. तसेच, ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 10 धावांची आघाडी मिळाली. (cricketer tammy beaumont double century in womens ashes test became first player of england )
महत्वाच्या बातम्या-
क्वालिफायरमध्ये बलाढ्य विंडीजच्या नांग्या ठेचल्यानंतर रझाचं विधान; म्हणाला, ‘भारतात जायच्या भूकेने…’
ईशांतने उलगडला विराटचा जीवनप्रवास, सांगितले सुरुवातीपासून आजपर्यंतचे किस्से, नक्की वाचा