क्रिकेटमध्ये अशी आख्यायिका आहे की, चांगली भागीदारी चांगले सामन्यात रंग भरते. तसेच चांगले मित्र इतिहास घडवतात. तशाच प्रकारे क्रिकेटच्या मैदानावर काही असे खेळाडू आहेत जे, आपल्या मैत्रीसाठी कायम क्रिकेटरसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांनी केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही आपल्या मैत्रीची मिसाल कायम ठेवली आहे. आशाच या काही क्रिकेटपटूंच्या जोड्या, जे मैदानाबाहेरही एकमेकांचे खूप जिवलग मित्र आहेत.
१. सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली
भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जाणारे, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर हे, आपल्या मैदानावरील भागीदारी सोबतच बाहेरच्या आयुष्यात देखील तितकेच जिवाभावाचे मित्र आहेत. १९९२ ते २००७ अशी तब्बल पंधरा वर्षे दोघे भारतीय क्रिकेटसाठी एकत्रितपणे खेळले.
सचिनला क्रिकेटचा देव तर गांगुलीला ऑफ साइडचा देव म्हटले जात. आपल्या कारकिर्दीत दोघांनी एकत्रितपणे ८२२७ धावांची भागीदारी देखील केलेली आहे.
सौरव गांगुली सचिन बद्दल सांगतो,
” मला सलामीवीर म्हणून खेळवायची योजना सचिनची होती. माझ्यासाठी हा माझ्या कारकीर्दीचा टर्निंग पॉइंट होता. मला कर्णधारपद देण्याचेही सचिनने सुचवले होते.”
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही दोघे एकमेकांबद्दल नितांत आदर बाळगत असल्याचे वारंवार दिसून येते.
२. युवराज सिंग व विराट कोहली
बरेच जणांना ठाऊक नाही की विराट आणि युवराज गंमतीने एकमेकांना ‘सिस्टर’ म्हणतात. त्या दोघांच्यातील नाते एखाद्या सख्ख्या बहिणींसारखे आहे असे त्यांना वाटते, म्हणून ते एकमेकाला सिस्टर सिस्टर म्हणतात.
जेव्हा कोहलीने भारताकडून खेळण्यास सुरवात केली तेव्हा युवराज आधीच संघातील महत्त्वाचा भाग होता. कोहलीने युवराजला आपला मोठा भाऊ मानले आणि हळूहळू ते उत्तम मित्र बनले.
आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस युवराज कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. २०१४ सालच्या आयपीएल मोसमात देखील विराटच्या आग्रहास्तव युवराजला आरसीबीच्या संघात सामील करून घेतले होते. आजही अनेकदा, सोशल मीडियावर युवराज आणि विराटला एकत्रितपणे मस्ती करताना आपण पाहतो.
३. एबी डिव्हिलियर्स आणि डेल स्टेन
द. आफ्रिकेचे हे दोन दिग्गज आपल्या मैत्रीसाठी ओळखले जातात. स्टेन व डिव्हिलियर्स यांनी सोबतच आपली क्रिकेट कारकीर्द सुरू केली होती. अनेक वर्ष कठीण प्रसंगी ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहीले. दोघांनी मिळून दक्षिण आफ्रिका क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविण्याचे काम केले आहे.
राष्ट्रीय संघात एकत्र करीत असले तरी आयपीएलमध्ये ते अनेकदा विरोधी संघात असलेले पाहायला मिळतात. डिव्हिलियर्सने स्टेनचा समाचार घेतलेला दिसतो. तर, कधी स्टेन डिव्हिलियर्सची विकेट घेतो. परंतु, त्या दोघांमधील मैत्रीत यामुळे कधी दुरावा आलेला नाही. सध्या दोघेही आरसीबीसाठी एकत्र खेळत आहेत.
४. कुमार संगकारा व माहेला जयवर्धने
भारतीय क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे सचिन आणि सौरवच्या मैत्रीचे उदाहरण दिले जाते त्याच प्रकारे श्रीलंकेमध्ये संगकारा व जयवर्धने यांच्या मैत्रीचे कौतुक करतात. श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवी ओळख मिळवून देण्याचे काम या जोडीने केले आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षी एका ट्रेनिंग कॅम्पमधून एकत्रितपणे सुरू झालेली ही मैत्री अजूनही कायम आहे. दोघेही एकमेकांच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळले. परंतु, तेथे त्यांना यश आले नाही. अखेरीस २०१४ टी२० वर्ल्डकप दोघांनी एकत्रितपणे जिंकत आपल्या कारकीर्दीत एक मानाचा तुरा रोविला.
संगकाराच्या लग्नावेळी गमतीने अनेकजण असे म्हणत, संगकाराचे लग्न त्यादिवशी कसे काय झाले? कारण त्याचा खरा साथीदार हा तर भारत दौऱ्यावर होता.
या दोघांनी मिळून हॉटेल व्यावसायही एकत्र सुरु केला आहे.
५. व्हीव्हीएस लक्ष्मण व राहुल द्रविड
लक्ष्मण आणि द्रविड दोघे आपल्या दमदार भागीदारी सोबतच, आपल्या निखळ मैत्रीसाठी प्रसिद्ध आहेत. भारतीय संघासाठी द वॉल आणि व्हेरी व्हेरी स्पेशल अशी भूमिका दोघांनी पार पडलेली आहे. दोघांनी प्रतिस्पर्ध्यांना आपल्या खेळाने अनेकदा अक्षरशः नामोहरम करून टाकले आहे
एकमेकांबद्दल चांगली समज असल्याने त्याचे प्रतिबिंब मैदानावर दिसत असत. लक्ष्मणबद्दल बोलताना द्रविड म्हणतो,
“जेव्हा मी फलंदाजी करत असत किंवा पव्हेलियनमध्ये बसलेला असो नाहीतर विकेट पडली असो लक्ष्मण असल्यावर सगळीकडे शांतता असायची. मला, वैयक्तिकरित्या शांत आणि समाधानाची भावना त्याच्यामुळे येत. त्याच्यासोबत हा प्रवास छान होता आणि लक्ष्मण सोबत खेळणे हा खरोखर एक उत्तम अनुभव होता होता.”
६. विराट कोहली व एबी डिव्हीलियर्स
आयपीएलमुळे एक गोष्ट छान झाली की, इतर देशातील खेळाडू आणि भारतीय खेळाडू एकत्रितपणे ड्रेसिंग रूममध्ये वेळ घालवू लागले. यामुळे अनेक खेळाडूंमध्ये छान मैत्री जमलेली आपण पाहतो. असे वेगवेगळे देशाचे असून खास मैत्री असलेले खेळाडू म्हणजे, एबी डिव्हिलियर्स आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली.
२०११ पासून एकत्रितपणे आरसीबीच्या संघाचे जय-वीरू असलेले विराट आणि डिव्हिलियर्स हे क्रिकेट जगतातील सर्वोत्तम मित्र म्हणून ओळखले जातात. गेली नऊ वर्ष दोघांनी आपल्या संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. त्याच बरोबर ज्यावेळी, हे दोघे आपल्या राष्ट्रीय संघासाठी खेळत तेव्हादेखील दोघांचा एकमेकांप्रती असलेला आदर ठळकपणे दिसून येत.
डिव्हिलियर्सची भारतात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. विराटला देखील दक्षिण आफ्रिकेत असाच मान मिळतो.
७. अनिल कुंबळे व राहुल द्रविड
आपल्या काहीश्या तापट स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला अनिल कुंबळे ज्या वेळी, रागावलेला असत तेव्हा, सचिन व गांगुली सारखे वरिष्ठ खेळाडूही त्याला समजावायची हिंमत करत नसत. अशावेळी त्याचा खास मित्र राहुल द्रविड पुढाकार घेऊन ती परिस्थिती हाताळत आणि कुंबळेला शांत करत.
कुंबळे आणि द्रविड दोघेही कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत. त्यामुळे दोघांच्यात आधीपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. एकाने गोलंदाजीत तर एकाने फलंदाजीमध्ये आपल्या देशाचे नाव मोठे केले.
कर्नाटकमधील त्यांचे मित्र, नातेवाईक, सहकारी खेळाडू अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना कर्नाटकचे दोन महान सुपुत्र असे म्हणतात
८. अँड्र्यू फ्लिंटॉफ व स्टीव्ह हार्मिसन
इंग्लंडचे दोन दिग्गज खेळाडू असलेले फ्लिंटॉफ व हार्मिसन हे १९९६ पासून एकमेकांचे खास जोडीदार होते. १९९६ युवा विश्वचषकात ते इंग्लंडच्या संघात सामील झाले होते.
इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात दोघांनी अनेक वर्ष खेळली. यादरम्यान, ज्यावेळी दोघेही संघात असत त्यावेळी ते रूममेट्स असत. दोघांचीही कारकीर्द काहीशी वादग्रस्त ठरली. परंतु, संपूर्ण संघ विरोधात गेला तरी हे दोघे कायम एकमेकाला आधार देत.
९. वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर
दिल्लीचे हे दोन खेळाडू अनेक वर्षांपासून एकत्र खेळत त्यामुळे ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजावून घेत. सेहवाग आक्रमक तर गंभीर स्थिर होऊन खेळणारा खेळाडू होता. तरीसुद्धा या दोघांमध्ये अतूट मैत्री होती.
परस्परविरोधी शैलीच्या या खेळाडूंनी भारतीय संघासाठी अनेक वर्ष आपली सेवा दिली. २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक विजेत्या या दोन्ही भारतीय संघाचे ते सदस्य होते. तर, आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सत्रात ते आपला घरगुती संघ दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून एकत्र खेळले.
१०. इयान बोथम व विवियन रिचर्ड्स
इंग्लंडचे महान अष्टपैलू खेळाडू सर इयान बोथम व वेस्टइंडीज चे दिग्गज फलंदाज सर विवियन रिचर्ड्स हे आपल्या मैत्रीसाठी क्रिकेटचाहत्यांच्या लक्षात आहेत.
दोघांनीही जवळपास दोन दशके एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानावर खेळले. पण निवृत्तीनंतरही दोघांमधील मैत्री तसूभरही कमी झालेली नाही आजही अनेकदा खासगी कार्यक्रमात दोघे एकत्रित आलेले दिसतात.
वाचनीय लेख –
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले ‘पाटील’ आडनावाचे ३ खेळाडू
सीमारेषेच्या आत आहे क्रिकेट मैदानावर झाडं, यावर शतक मारल्यावर गांगुलीला झाली होती शिक्षा
वनडे, टी२०क्रिकेट गाजवलेले पण कसोटी क्रिकेट नशिबात नसलेले ४ क्रिकेटर