एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद जिंकले. चेन्नईने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ओएन मॉर्गनच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा २७ धावांनी पराभव केला. यासह चेन्नईने तब्बल चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्याचबरोबर चेन्नईच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.
चेन्नईने यापूर्वी २०१०, २०११ आणि २०१८ साली विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे चेन्नई असा एकमेव संघ ठरला आहे, ज्यांनी तीन वेगवेगळ्या दशकात आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. यापूर्वी असा कारनामा अजूनतरी कोणत्या संघाला करता आलेला नाही.
सध्या चेन्नईपेक्षा अधिक आयपीएल विजेतीपदं मुंबई इंडियन्सने मिळवली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली आयपीएलची एकूण ५ विजेतीपदं जिंकली आहेत. पण, त्यांनी ही सर्व विजेतीपदं एकाच दशकात जिंकली आहेत.
तसेच या दोन संघांशिवाय अन्य कोणत्याच संघाला २ पेक्षा अधिक आयपीएल विजेतीपदं जिंकता आलेली नाहीत. सर्वाधिकवेळा आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या बाबतीत मुंबई आणि चेन्नई पाठोपाठ कोलकाता आहे. कोलकाताने २०१२ आणि २०१४ साली आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्रत्येकी एकवेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.
चेन्नईचे चौथे विजेतेपद
अंतिम सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी चेन्नई संघ उतरला. चेन्नईकडून सलामीला फलंदाजीसाठी करणाऱ्या फाफ डू प्लेसिसने या सामन्यांत ५९ सामन्यांत ८६ धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने ऋतुराज गायकवाडसह(३२) ६१ धावांची, रॉबिन उथप्पासह(३१) ६३ धावांची, तर मोईन अलीसह(३७*) ६८ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा करता आल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरेल्य कोलकाताला १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर(५०) आणि शुबमन गिल (५१) यांनी अर्धशतके केली. पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे चेन्नईने चौथे आयपीएल विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीकडून घडली मोठी चूक अन् जडेजा- गायकवाडने लावला डोक्याला हात; व्हिडिओ पाहाच
द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यामागे ‘लॉर्ड’ शार्दुल कनेक्शन?